Shivsena Political News : शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार सध्या चांगले चर्चेत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीच्याच उमेदवाराविरोधात काम करत त्यांनी काँग्रेस मधील आपल्या जुन्या सहकाऱ्याला मदत केली. रावसाहेब दानवे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात सत्तार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत सत्तार यांनी काँग्रेसमध्ये असूनही विरोधात काम केले होते.
त्याचीच पुनरावृत्ती राज्यात महायुती असताना सत्तार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अधिकृत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधातच बंड पुकारत विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) काँग्रेसचा हात सोडला होता. राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता येणार याची खात्री पटल्यामुळे सत्तारांनी थेट भाजपमध्येच जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मतदारसंघांमध्ये आतापर्यंत काम केले, त्यांचाच प्रचार कसा करायचा ? असे म्हणत स्थानिक भाजप नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला होता.
तेव्हा रावसाहेब दानवे यांनी फार विरोधाची भूमिका न घेता शांत राहणे पसंत केले होते. त्यामुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालत सत्तारांचा भाजप प्रवेश रोखला होता. एक अल्पसंख्यांक चेहरा युतीसोबत येत आहे हे पाहून फडणवीस यांनी तेव्हा मार्ग काढला आणि भाजपच्या वाट्याची जागा शिवसेनेला सोडत सत्तारांना तेव्हा धनुष्यबाण हाती घेण्यास भाग पाडले.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केलेल्या अब्दुल सत्तार यांनी त्यांना सिल्लोड मध्ये प्रचाराला आणत जोरदार शक्ती प्रदर्शन तर केलेच, पण मराठा आरक्षणाचा प्रभाव असतानाही विजय मिळवत हॅट्रिक केली. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या वेगळ्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि शिवसेनेत गेलेल्या अब्दुल सत्तारांना कॅबिनेट ऐवजी राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले.
तेव्हा नाराज झालेल्या सत्तार यांनी संयम दाखवत महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहिली. शिवसेनेत बंडाची तयारी सुरू असताना अब्दुल सत्तार यांनी त्यात हिरारीने सहभाग घेतला आणि पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कॅबिनेट पदी बढती घेत थेट कृषी मंत्री होण्याचा मान पटकावला. जिथे सत्ता तिथे सत्तार असं नेहमी सांगणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीआधी अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेने सोबत आपला प्रसंगी करार झाला आहे, मी सच्चा शिवसैनिक नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे. तो विश्वास ज्या दिवशी संपेल त्यादिवशी मी वेगळा निर्णय घेईल, असे संकेत अब्दुल सत्तार अधून मधून देत असतात. विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आलेल्या असताना अब्दुल सत्तार यांनी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या अनेक योजना मतदारसंघात आणल्या.
याशिवाय राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकल्प, एमआयडीसी, पाणीपुरवठ्याच्या योजना आणत कोट्यावधींचा निधीही एकनाथ शिंदे यांच्याकडून पदरात पाडून घेतला. मतदारसंघात आपले स्थान बळकट करत सत्तार 2024 च्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता येते की महाविकास आघाडीची ? याचे सूक्ष्म निरीक्षण करत आहेत. महायुतीची सत्ता येणार नाही, असा निष्कर्ष जेव्हा निघेल तेव्हा अब्दुल सत्तार विधानसभा निवडणुकीआधी दुसऱ्या पक्षात दिसले तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात त्यांची पहिली पसंती आपल्या जुन्या पक्षाला म्हणजेच काँग्रेसला असेल, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.