Lok Sabha Election: लोकसभेसाठी रणरागिणी मैदानात, राज्यातील प्रमुख पक्षांकडून 14 महिलांना संधी

Women Candidates For Lok Sabha Election: यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघांत प्रमुख पक्षांकडून महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील या लोकसभेत देशभरातून 78 महिला निवडून आल्या होत्या.
Pankaja Munde, Praniti Shinde, Navneet Rana, Heena Gavit, Raksha Khadse
Pankaja Munde, Praniti Shinde, Navneet Rana, Heena Gavit, Raksha KhadseSarkarnama

Lok Sabha Election 2024: महिला सध्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्या जिथे जातील तिथे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. देशातील सर्वोच्च पदेदेखील महिलांनी अनेकदा भुषवली आहेत. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही देशभरातली अनेक महिला उतरल्या आहेत, तर या निवडणुकीत महाराष्ट्रातील तब्बल १४ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

महाराष्ट्रातील 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Constituency) प्रमुख पक्षांकडून 14 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील या लोकसभेत देशभरातून 78 महिला निवडून आल्या होत्या. महिला खासदार संख्येचा तो उच्चांक समजला जातो, तर याच लोकसभेत महाराष्ट्रातून 8 महिला खासदार निवडून गेल्या होत्या. यंदाच्या लोकसभेतही तो विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवार विरुद्ध पवार अशा बारामतीमधील (Baramati) लढतीकडे सर्वाधिक लक्ष वेधले आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या सलग तीन वेळा लोकसभेत चांगल्या कामगिरीच्या जोरावर चमकत आहेत, तर सुनेत्रा पवार नवख्या असल्या तरी त्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी, पवार घराण्याच्या सून व ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी म्हणून त्याही तगड्या उमेदवार मानल्या जातात. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात (Yavatmal-Washim Constituency) शिंदेंच्या शिवसेनेकडून राजश्री पाटील या उभ्या आहेत. त्यांचे पती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे राजकारण, त्यांचे स्वतःचे संभाषणकौशल्य, गोदावरी अर्बन बँक, गोदावरी स्कूल, महिला बचत गट व इतर सामाजिक कार्याचा मोठा पट त्यांच्यामागे उभा आहे. त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्याशी आहे.

दिंडोरी मतदारसंघातून (Dindori Constituency) केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांना भाजपने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. पवार यांची लढत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांच्याशी होत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या उमेदवार आहेत. त्यांची लढत श्रीकांत शिंदे यांच्याशी होण्याती शक्यता आहे. कल्याण डोबिंवली महापालिकेत दरेकर यांनी नगरसेवक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.

नंदूरबार मतदारसंघातून डॉ. हिना गावित (Heena Gavit) या तिसऱ्यांदा भाजपकडून आपले नशीब आजमावत आहेत. पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता त्यांना उमेदवारी मिळाली आहे. धुळे मतदारसंघातून कॉँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bacchav) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

Pankaja Munde, Praniti Shinde, Navneet Rana, Heena Gavit, Raksha Khadse
Lok Sabha Election 2024 : हे कसलं राजकारण? कुणाची घरं फुटली, कुठं नाती दुभंगली!

जळगावात स्मिता वाघ या भाजपकडून लढत आहेत, तर रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे या उमेदवार आहेत. त्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून असून, सलग तिसऱ्यांदा त्या जिंकतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अमरावती मतदारसंघातून भाजपच्या वतीने खासदार नवनीत राणा उमेदावर आहेत. गेल्यावेळी त्या अपक्ष म्हणून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लोकसभेत पोहोचल्या होत्या. नंतर त्यांनी भाजपशी जवळीक वाढवली महाविकास आघाडी व विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली होती. त्यांच्या बनावट जातप्रमाणपत्राचा मुद्दाही खूप गाजला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरविल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

Pankaja Munde, Praniti Shinde, Navneet Rana, Heena Gavit, Raksha Khadse
Dhule Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर करणे निवडणूक जिंकण्याएवढेच दिव्य!

बीड मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्या राज्यात कॅबिनेट मंत्रीही होत्या. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांची लढत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आहे. त्यांचे पती दिवंगत सुरेश धानोरकर हे या मतदारसंघाचे खासदार होते. प्रतिभा धानोरकर या वरोरा-भद्रावतीच्या आमदार असून, सामाजिक कार्यात त्या सतत अग्रेसर असतात.

Pankaja Munde, Praniti Shinde, Navneet Rana, Heena Gavit, Raksha Khadse
Sheetal Mhatre On Sharad Pawar : 'सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा', शीतल म्हात्रेंचे शरद पवारांना सडेतोड उत्तर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. त्यांची लढत भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्याशी आहे. उस्मानाबाद-धाराशिव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्चना पाटील निवडणूक लढवत असून, त्यांची लढत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी आहे. त्यामुळे राज्यात महिला उमेदवार चुरशीची लढत देणार असून, यांच्यापैकी किती उमेदवारांना मतदार लोकसभेत जाण्याची संधी देणार हे पाहणं महत्वाचं आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com