
Sanjay Rathod News : भारतीय जनता पक्षातील एका नाराज गटाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातून मिळत असलेल्या दुजाभावाच्या वागणुकीला कंटाळून शहरी, तसेच ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत गोपनीय बैठक घेतली.
या बैठकीत अधिकृत प्रवेशाबाबत चर्चा झाली असून, लवकरच त्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. याचा फटका आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत भाजपने यवतमाळ मतदार संघातील ग्रामीण भागात चांगलेच वर्चस्व निर्माण केले होते. ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या फळीमुळे पक्षाला बळ मिळाले होते. माजी आमदार मदन येरावार यांच्या हाकेला 'ओ' देणारे निष्ठावंत पदाधिकारी होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांना पक्षातूनच दुजाभावाची वागणूक दिल्या जात आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आपला नेता म्हणून बऱ्याचवेळा माजी आमदार मदन येरावार यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तरीसुद्धा कुठल्याच प्रकारे फायदा झाला नाही. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनेक इच्छुकांनी दंड थोपटलेले आहेत. मात्र, वशीलेबाजीशिवाय तिकीट मिळणार नाही, अशी शाश्वती पदाधिकाऱ्यांना झाली आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोडून बाहेरून आलेल्यांनाच पक्षात प्राधान्य दिल्या जात आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. ही नाराजी दूर होत नसल्याचे पाहून शहरी तसेच ग्रामीण भागातील भाजपच्या एका गटाने नुकतीच पालकमंत्री संजय राठोड यांची गुप्त भेट घेतली. त्यानंतर जांब रोडवरील वनविभागाच्या विश्रामगृहात पालकमंत्री संजय राठोड, पराग पिंगळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या नाराज गटाची बैठक पार पडली.
या बैठकीत पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. लवकरच एका कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गट शिंदे सेनेत प्रवेश करणार आहे. यातून शिंदे सेनेला बळकटी मिळणार असून, भाजपला मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविल्या जात आहे.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कार्यक्रम लागणार आहे. या निवडणुकीत उभे राहण्याकरिता अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्ती केली आहे. मात्र, वेळेवर तिकीट नाकारल्यास पर्याय म्हणून दुसऱ्या पक्षाशी नाते घट करण्याचा प्रयत्न आतापासूनच अनेकांनी चालू केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस, भाजप, शिंदे सेना, ठाकरेंची शिवसेना पक्षात उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीची युती होती. तरी लोकसभेत युतीला अपेक्षित यश मिळाले नाही. तर विधानसभेत भाजप वगळता इतर दोन्ही पक्षाला अपेक्षित जागांवर विजय मिळविता आला नाही. असा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला बसू नये, यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून विशेष प्रयत्न केल्या जात आहे. आता पक्ष संघटन करण्यावर भर दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.