BMC News : कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक दावा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. देशपांडे यांनी कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह मांडणी करत असल्याचा दावा केला. कोरोना काळात मालाड येथे उभारलेल्या कोरोना सेंटरची कंत्राटे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा गंभीर आरोपही देशपांडे यांनी केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेत कोरोना कालावधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत गंभीर आरोप केले आहे. यावेळी मालाडचे तत्कालीन प्रभाग अधिकारी मकरंद दगडखैरे उर्फ महेश पाटील हा अधिकारी आणि कंत्रादारांचे व्हॉट्सअप चॅट देशपांडे यांनी उघड केले. अधिकची बिलं लावून त्यातील हिस्सा वेगवेगळ्या लोकांना दिला जात असल्याचा आरोपही संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी केला आहे.
देशपांडे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच वीरप्पन गँगचा घोटाळा मी उघड करणार असे ट्विट केलं होतं. त्यानंतर त्याखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मला शिवीगाळ केली. त्यावरुन युवा सेनेवरचा माझा संशय पक्का झाला. आम्ही तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी कोरोना सेंटरमध्ये जेवण पुरविणे, लाँड्री, सॅनिटायझर पुरविणे यासारखी कंत्राटे युवासेनेचा पदाधिकारी वैभव थोरात यांच्या कंपन्यांना देण्यात आली. हे काम देत असताना त्याच्या कंपनीचा कोणताही पुर्वानुभव तपासला गेला नाही. मग ही कंत्राटे देण्यासाठी कोणती शक्ती काम करत होती? याचा तपास केला पाहिजे अशी मागणी देशपांडे यांनी केली.
कोरोना काळात संबंधित कंपन्यांना ७० ते ७५ कोटींची कामे दिली असल्याची आमचा अंदाज आहे. या भ्रष्टाचाराचे पुरावे ईडी, आयटीकडे देणार असून त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. आम्ही केवळ व्हिसल ब्लोअर आहोत. या भ्रष्टाचाराची माहिती आम्ही फक्त जनतेसमोर आणि माध्यमांसमोर ठेवत आहोत. बाकी यंत्रणांनी याची चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी केली. तसेच यंत्रणांनी जर दखल घेतली नाही, तर मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही जाऊन याबाबत मागणी करणार असल्याचंही देशपांडे यांनी सांगितलं आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.