मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेहमीच भाजपच्या निशाण्यावर असते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदूत्त्वाचा मुद्दा पेटला असतानाच, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी, आपण लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची शनिवारी (१६ एप्रिल) घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली असून त्यांची टीम आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन करणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य ठाकरे अयोध्येला जाऊ शकतात. या दौऱ्याच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊनच भाजपला हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर उत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे.
भायखळा येथील राणीबागेतील अनेक प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळीही त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पाच वर्षांत रंग बदलल्याने हिंदुत्व येत नाही. हिंदुत्व आपल्या मनात आणि रक्तात आहे. आम्हाला कोणाकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, अशा शब्दांत मनसेचे नाव न घेता टोला लगावला. एक-दोन नवीन पक्ष हिंदुत्वाच्या नावाखाली काहीही करू लागले आहेत. शिवसेना अनेक वर्षांपासून हनुमान जयंती साजरी करत आली आहे. असेही त्यांनी नमुद केले. याच वेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाबाबत विचारले असता. आपण नवनीत राणांना ओळखतही नाही, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. राज ठाकरे म्हणाले की, नमाजासाठी रस्ते आणि पदपथ कशाला हवेत? तुमची प्रार्थना तुमच्याच घरीच करा ? त्यांना आमचा मुद्दा समजला नाही तर तुमच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवली जाईल. आम्ही राज्य सरकारला सांगतो की आम्ही या मुद्द्यावरून मागे हटणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, असे म्हणत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला दंगली नकोत. 3 तारखेपर्यंत सर्व लाऊडस्पीकर मशिदीतून काढून टाकावेत, आमच्या बाजूने कोणतीही अडचण येणार नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते.
तर राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टिका करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला. ''काही लोक हनुमान चालीसा म्हणण्यासाठी पुण्याला गेले, काहींनी भाड्याने हिंदुत्व घेतले, कोल्हापूर पोट निवडणूकमध्ये जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरविले, भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, कोल्हापूरकरांनी विरोधकांचे भोंगे खाली उतरवलेत, हिजाब वादानंतर आता हनुमानावरून राजकारण सुरू आहे. भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,'' अशा शब्दात राऊतांनी विरोधकांना सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.