Mumbai News, 04 Oct : शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात पुढच्या आठवड्यातच काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
फडणवीसांनी दिलेल्या या माहितीमुळे 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 'गट ब आणि क' पदांची जाहिरात काढण्यासाठी आपण एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून विनंती केल्याची माहितीही फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे.
आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांनी लिहिलं की, शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. आज MPSC अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे."
राज्यात कधीही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यापूर्वी शासन आता अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाच्या अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त आहेत. यावर विरोधकांकडून सतत टीकाही केली जाते. अशातच आता फडणवीसांनी शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात लवकरच काढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
तर दुसरीकडे फडणवीसांच्या याच ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी ट्विटमध्ये लिहिलं की, कम्बाईन परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाची कुठलीच हरकत नाही, केवळ आपल्या गृहविभागाकडून PSI पदाचे मागणीपत्रक आयोगाकडे गेले नसल्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकलेली नाही.
त्यामुळे आपल्या विभागाने तत्काळ रिक्त पदांचे मागणी पत्रक आयोगाला पाठवून सहकार्य केल्यास जाहिरात त्वरित प्रसिद्ध होऊ शकते. राज्यात PSI च्या जवळपास 2500 जागा रिक्त आहेत, त्यामुळे ज्याप्रमाणे 2012 मध्ये तत्कालीन गृहमंत्री स्व.आर आर आबांनी 1852 जागांची भरती केली होती.
त्याचप्रमाणे यंदा आपण देखील मोठी जाहिरात प्रसिद्ध करावी तसेच राज्यसेवा जागावढीचा प्रश्न देखील मार्गी लावावा ही विनंती. असो, असो उशिरा का होईना आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली याबद्दल आपले आभार," अशा शब्दात पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधत त्यांचे आभार देखील मानले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.