Mumbai News, 6 June : ठाकरे काय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खुद्द नानाभाऊंनी बजावूनही सांगलीतून खासदार होण्याच्या ईर्ष्येने विशाल पाटलांनी अर्ज भरला. 'आपण निवडून येणार आणि दिल्लीत दिमाखात जाणार' छातीठोकपणे सांगून पाटलांनी सांगलीत 'विशाल' विजय खेचून आणला.
भाजपच्या नेटवर्कमुळे खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) हमखास निवडून येतील, असं सांगितलं जात होते. पण, निवडणूक लढणार आणि जिंकणार, असं म्हणत इरेला पेटलेल्या विशाल पाटलांनी संजयकाका पाटलांचा पराभव केला.
निवडणूक निकालानंतर विशाल पाटील (Vishal Patil) काय भूमिका घेणार, याकडे लक्ष असतानाच, विश्वजीत कदमांच्या पुढाकाराने ते मुंबईत नानाभाऊंची भेट घेणार आहेत. त्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेसचे 'हात' बळकट करणार असल्याने या पक्षाच्या 13 खासदारांची संख्या 14 होईल.
राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपच्या संजयकाका पाटलांचा एक लाखाच्या मताधिक्यानं पराभव केला.
त्यामुळे हॅटट्रीक नोंदवण्याचं संजयकाका पाटलांचं स्वप्न भंगलं. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यावर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली.
सांगली लोकसभा मतदारसंघातील जागावाटपावरून 'इंडिया' आघाडीत बराच काळ राष्ट्रीय पातळीवर खल सुरू होता. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा ठरला. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष ही निवडणूक लढली होती.
महाविकास आघाडीतर्फे चंद्रहार पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. सुरूवातीला तिरंगी वाटणारी ही निवडणूक दुरंगी झाली. विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात सामना झाला. त्यात विशाल पाटील यांनी बाजी मारली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.