Mumbai News, 07 Sep : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी दमबाजी केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
हे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय बनल्यामुळे खुद्द अजित पवारांना त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या मागणीमुळे पक्ष पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कारण या आमदार महाशयांनी थेट या महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीत घोळ झाल्याचा संशय व्यक्त केला. शिवाय IPS अंजना कृष्णा यांची नियुक्ती देखील बनावट कागदपत्रांद्वारे झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित करत मिटकरींनी अंजना कृष्णा यांची थेट पूज खेडकरशी तुलना केली. यामुळे पुन्हा विरोधकांनी अजित पवारांच्या पक्षावर सडकून टीका केली.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकून यांनी देखील मिटकरींच्या मागणीवरून राष्ट्रवादी पक्षावर टीका केली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारावर आपला पक्ष चालत असल्याचे सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने आयपीएस अधिकाऱ्याच्या जातीवर येणे निंदनीय आहे. मिटकरींना कृष्णा यांच्या दस्तावेजाची आताच कशी काय आठवण झाली? असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, मिटकरी यांच्या मागणीमुळे पक्षाची होत असलेली बदनामी लक्षात घेता आता वरिष्ठांच्या सांगण्यावरून आमदार मिटकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलं की, "सोलापूर घटनेसंदर्भात केलेलं ट्वीट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो.
ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलीस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे."
दरम्यान अमोल मिटकरी यांनी आपल्या आधीच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, ज्या राज्यात आपली नियुक्ती झाली, त्या राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर नेते व महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे. ज्या अधिकाऱ्यांना ही माहिती नसेल त्यांच्या कागदपत्रांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने पडताळणी करावी.
एका आयपीएस अधिकाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री कोण, हे कळत नसेल तर ते त्यांच्या शिक्षणाचे दुर्दैव म्हणावे का?, पुजा खेडकर यांच्याप्रमाणे अंजना कृष्णा यांची नियुक्ती देखील बनावट कागदपत्रांद्वारे झाली आहे का? असा सवाल करत त्यांनी अंजली कृष्णा यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.