
New Delhi News : ज्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण समजलं जातं. राज्याच्या राजकारणात ज्यांचा उल्लेख भीष्म पितामह म्हणून केला जातो,अशा शरद पवारांचा (Sharad Pawar) 85 वा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींसह राजकीय वर्तुळातून पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
त्यातच दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा धक्का पचवत नाही, तोच एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) देखील शरद पवारांची भेट घेतली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (ता.12) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 6 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शाहांचं स्वागत केले. शाह आणि शरद पवार यांची ही भेट काही मिनिटांचीच होती.या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त भाजप नेते अमित शाह यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पवारांच्या निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. गुरुवारी सकाळीच शाहांनी शरद पवारांना फोन करुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. तरीदेखील शाहांनी प्रत्यक्ष पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीला अनन्य साधारण महत्त्वाची मानली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ,सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवारांची आज सकाळी दिल्लीत भेट घेतली.वाढदिवसानिमित्त घेतलेली भेट असं जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून सांगण्यात येत असले तरी त्यामागे नवी राजकीय समीकरणं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी अजित पवार आणि शरद पवार भेटीवर मोठं विधान केलं आहे.ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आता काहीही होऊ शकते. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात, असा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. याचवेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास आमचं काहीही नुकसान होणार नाही असंही वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमित शाह - शरद पवार भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे म्हणाले, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आलो आहोत. त्यांच्या आशीर्वादानेच आमची राजकीय वाटचाल झाली. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देणे, दर्शन घेणं हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शरद पवारांच्या भेटीला गेले. संपूर्ण देशभारत एक वेगळंच वातावरण असतं. राजकीय क्षेत्रामध्ये वेगळ्याच चर्चा केल्या जातात, त्याच्यापलीकडे आज उत्तम सद्भावना केंद्रीय गृहमंत्र्यांनी दाखवल्या आहेत, असं विधानही तटकरे यांनी केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असल्याची माहिती आहे. या पत्राद्वारे दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची विनंती पवारांनी मोदींना केली आहे. दिल्लीत होत असलेल्या यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणार आहे. पवारांच्या पत्राबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.