Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर आता पदवीधर निवडणूक होत आहे. पदवीधर निवडणुकीच्या मतदार यादीत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप माजी मंत्री अनिल परब यांनी केला. मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचा स्वीकार होत नाही. माझ्या स्वत:च्या मुलीचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे. माझ्या घरातील असे अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, असा आरोप परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेकडून (Shivsena) अनेक जणांची नावे अपलोड करण्यात आली आहेत, त्याची पोचपावती आली आहे. पण कुठलंही कारण न देता, मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाने नोंदवलेली नावे कट झाली आहेत. त्या उलट भाजपने (Bjp) नोंदवलेली सर्व नावे आली आहेत, असा आरोप अनिल परब यांनी यावेळी केला. (Anil Parab News)
निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल आम्ही वर्षभर बोलत आहोत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था पण ती कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधली आहे का? असा सवाल त्यांनी केला. निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टाने देखील ताशेरे ओढले आहेत. निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या आदेशावरून काम करते, असे आम्हाला दिसले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आम्हाला माहित आहे हा सर्व प्रकार जाणून-बुजून करण्यात आला आहे. यामध्ये मोठया प्रमाणात राजकीय हस्तेक्षप झाला आहे. आम्हालातर नोंदणी केल्यानंतर स्लीप दिली आहे. जर आम्ही काही चुकीचं केले असत तर लगेच तिकडे सांगितले असते किंवा काही दिवसांनी सांगितले असते की तुमचीही नोंदणी रद्द झाली आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून काहीच सांगण्यात आले नाही, असा आरोप परब (Anil Parab) यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे वरळी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विरोधात जो कोणी येईल, त्याच डिपाॅजिट रद्द होईल, असे स्पष्ट केले. वाडवण बंदराला त्या भागातील नागरिकांचा विरोध आहे, आम्ही त्यामुळे नागरिकांसोबत आहोत, असेही यावेळी परब यांनी स्पष्ट केले.