Mumbai News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अक्षरश: धुतले. भाजपमध्ये औरंगजेबाचे गुण असल्याची टीका केली तर फडणवीस फक्त मस्टरवर सही करण्यापुरतेच उरणार असल्याची खिल्लीही उडवली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडले नाही. ठाकरेंच्या टीकेवर पलटवार करताना भाजप मुंबई शहराध्यक्ष अशिष शेलांरांनी ठाकरेंना अफजलखान, औरंगजेबनंतर इंग्रजांची उचकी लागल्याचे म्हटले आहे. मुंबईचा विकास इंग्रजांनी केला तर तुम्ही २५ वर्षांत काय केले, असा प्रश्नही शेलारांनी यावेळी उपस्थित केला. (Latest Political News)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि संभाजी बिग्रेडच्या एकत्रित मेळाव्यात बोलताना ठाकरेंनी भाजप, फडणवीस आणि पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला होता. याचा हिशोब भाजप चुकता करणार यात काही शंका नाही. त्याची सुरुवात शेलारांनी केली असून ठाकरेंना त्यांचा उघडा पडणारा कारभार झाकण्याचा खोचक सल्ला दिला आहे. तसेच भाजपऐवजी काँग्रेसने काय केले असे त्यांना विचारा म्हणत ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्नही आशिष शेलार यांनी केला आहे.
टि्वट करून शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उडवली आहे. ते म्हणाले, "अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती! म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले? आज मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना.. त्यांनी साठ वर्षात काय केले ?", असा सवाल शेलारांनी ठाकरेंना केला आहे.
भाजप मुंबईसाठी काय करतेय लोकांना माहिती असून तुमचा उघडा पडणारा कारभार झाका, असा सल्लाही शेलारांनी ठाकरेंना दिला. "तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा? आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे.. त्यांना सगळा हिशेब देऊच! तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका? तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका!" असा टोलाही शेलारांनी ठाकरेंना लगावला आहे.
पंतप्रधान मोदींनी भाजपविरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची तुलना 'ईस्ट इंडिया कंपनी'सोबत केली होती. यावर ठाकरेंनी मोदींचाही समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, "तुम्ही परदेशात जातात बायडनला मिठ्या मारता, तेव्हा तुम्ही इंडियाचे पंतप्रधान म्हणून जातात की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता?" असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. भाजप, फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल्याने भाजप ठाकरेंना कशाप्रकारे उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.