Mumbai News : भाजप नेते, केंद्रीय मंत्री अमित शाह रविवारी पुण्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जंयत पाटील आणि जितेंद्र आव्हाड भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशी चर्चा होणेच माझ्यासाठी अपमानाची बाब आहे, असे म्हणत माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. पाटलांनंतर आव्हाडांनी भूमिका स्पष्ट केल्याने राज्याच्या राजकारणातील उठलेला संभ्रमाचा धुरळा शांत होणार का याकडे लक्ष लागले आहे. (Latest Political News)
आव्हाडांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार गटातील तेरा जण कुठेही जाणार नसल्याचे सांगितले. आव्हाड म्हणाले, "जयंत पाटलांचा कुठलाही वेगळा गट नसून आम्ही सगळे एकत्रित शरद पवारांसोबत आहोत. जयंत पाटलांनीही या चर्चेबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. आम्ही तेरा जण तसूभरही लांब जाणार नाही. माझ्याबाबत चर्चा होणे हाच माझा आपमान आहे. मंत्रिमंडळ विस्तार करणे हे त्यांचे काम आहे. त्यात आमच्या तेरापैकी कुणीही नसणार याची खात्री मी देतो. आम्ही मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत असणार", असे त्यांनी ठासून सांगितले.
आक्रमक विरोधकांना विचलीत करण्यासाठीच असे संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत असल्याची टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "आता लोक मणिपूर, महागाई, पालघर फायरिंग, राज्यातील दंगलीबाबत, संभाजी भिडेंच्या दलालीबाबत बोलत आहेत. यातूनच आक्रमक होत असलेल्या विरोधकांबाबत संभ्रमाचे वातावरण केले जात आहे. पण लोक त्याला बळी पडणार नाहीत."
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जयंत पाटील आणि अमित शाह यांची कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. "काही लोकांना अफवा उठवायला आवडतात. माध्यमांनीही खात्री करुन बातम्या दिल्या पाहिजेत. जयंत पाटील यांची कुठलीही भेट अमित शाह यांच्याशी झालेली नाही. जे पतंगबाजी करत आहेत, त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी देखील स्तर ठेवला पाहिजे. कन्फर्मेशन केल्यानंतरच अशा बातम्या दिल्या पाहिजेत", असे फडणवीस म्हणाले होते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.