Mumbai News : अंबरनाथ येथील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार बालाजी किणीकर यांनी पक्षातील वाळेकर गटाची माफी मागत नाराजी दूर केली. मात्र आता त्यांच्यापुढे एक वेगळीच डोकेदुखी पक्षाच्या कल्याण ग्रामीणमधील भूमिकेमुळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांना उमेदवारी दिली. यामुळे हीच का परतफेड, अशी चर्चा मनसेसैनिकांमध्ये रंगली आहे. अंबरनाथमध्ये मनसेचे पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे आता किणीकरांना मनसेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येथून मनसेचे (MNS) एकमेव आमदार राजू पाटील यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर आहेत. मनसे व शिवसेना ठाकरे पक्षाची येथे मुख्य लढत होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र आता येथे महायुतीमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे आता येथे शिवसेना शिंदे, शिवसेना ठाकरे आणि मनसे, अशी तिरंगी लढत रंगणार आहे. तिन्ही पक्षांचे उमेदवार हे भूमिपुत्र असल्यामुळे कल्याण ग्रामीण मधील मतदार भूमिपुत्र आता कोणाच्या पारड्यात आपले मत सर्वाधिक टाकतो हे पहावे लागेल.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी मनसे पुढे मैत्रीचा हात पसरला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मैत्रीचा हात स्वीकारत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना आदेश देत खासदार शिंदे यांना मदत करण्यास सांगितले होते. पक्षप्रमुखांचा आदेश मानत आमदार राजू पाटील यांनी खासदार शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावत प्रचारात उतरले अन् शिंदे यांच्या विजयात खारीचा वाटा उचलला.
लोकसभेतील मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदेंनी मनसेला मदत करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिंदेनी आपली वेगळी चाल कल्याण ग्रामीण मधून खेळली आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत येथील उमेदवार शिंदे गटाने घोषित केला नव्हता.
मनसे व ठाकरे पक्षाला गाफील ठेवत सोमवारी रात्री शिवसेना शिंदे पक्षाने येथे राजेश मोरे यांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली. मंगळवारी राजेश मोरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या या खेळीमुळे मनसैनिकांमध्ये मात्र प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. हीच का परतफेड ? असे संदेश समाज माध्यमातून लागले असून शिंदे गटाला टार्गेट केले जात आहे.
मनसैनिक आता शिवसेना शिंदे पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या पावित्र्यात आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघात मनसेने आपला उमेदवार दिलेला नाही. येथे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध मनसेने जपले आहेत.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे न गेल्याने येथील भाजपचे पदाधिकारी नाराज आहेत, या नाराज पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्याचे काम मनसैनिक आता करणार आहेत.
अंबरनाथमध्ये मात्र शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसून अंबरनाथमधील मनसेचे पदाधिकारी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पक्षाच्या कल्याण ग्रामीण मधील भूमिकेमुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय अंबरनाथचे आमदार किणीकर यांची डोकेदुःखी वाढणाची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.