
Lad Vs Danave: विधानपरिषदेत आज महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ वर चर्चा सुरु असताना मोठा वाद पाहायला मिळाला. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. याचं कारण ठरलं प्रसाद लाड यांचं एक विधान. शिवसेनेच्या आमदारांनी कडवी डावी विचारधारा या शब्दांवर आक्षेप घेतला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लाड यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत शिवसेनेनं कम्युनिस्ट विचारधारा मारुन शिवसेना वाढवली असं विधान केलं. या विधानावर दानवे यांनी जोरदार आक्षेप घेतला, त्यानंतर दोघांमध्ये बराच वाद झाला. अखेर दानवे यांनी आमचा या विधेयकाला विरोध असल्याचं सांगत सभात्याग केला.
विधानपरिषदेत जनसुरक्षा विधेयकावर चर्चा सुरु असताना सुरुवातीला शिवसेनेचे अनिल परब यांनी या विधेयकावर आक्षेप घेतला. परब यांनी आपला मुद्दा मांडताना म्हटलं की, हे विधेयक मांडण्यापूर्वी जर आपल्या देशाची घटना तुम्ही आधी बघितली असतील तर बरं झालं असतं. आपल्या देशाच्या घटनेत डावा, उजवा, मधला असं काहीही नाही. राज्यघटनेत समानता म्हणजे सर्वजण सारखेच असं म्हटलं आहे. नक्षलवाद, दहशवाद याचं समर्थन करायला आम्ही उभे नाही, तर तो संपला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आपल्याकडं आज दहशवातविरोधी तीन ते चार कायदे आहेत. या विधेयकाचा गैरवापर कसा होऊ शकतो. यामुळं एखाद्याला ठरवून टार्गेट केलं जाऊ शकतं. जे युएपीएमध्ये शक्य नाही ते जनसुरक्षा कायद्यात शक्य आहे.
आपले गृहमंत्री सांगतात की नक्षलवाद संपला आहे मग या कायद्याचा उद्देश काय? हा कायदा कशासाठी आणला आहे? उजव्या संघटना या धर्मावर आधारित आहेत. मग पहलगाममध्ये ज्यांनी आपल्या लोकांना गोळ्या घातल्या त्यांना तुम्ही वेगळा न्याय देणार. मग तुम्ही डाव्यांसाठी का? उजव्यांसाठी का नाही? डावे आणि उजवे असं तुम्हाला वेगळं करता येणार नाही. त्यामुळं तुम्ही विधेयकाची जी रचना केली आहे, ती परिपूर्ण नाही. तुम्ही आत्ता जो उद्देश सांगितला तो यातून सफल होत नाही.
त्यानंतर सचिन अहिर यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं की, ज्या हेतून तुम्ही हा कायदा आणला आहे, बहुमताच्या जोरावर जरी तुम्ही हा कायदा पास केला तरी जनमनातील भावना तुम्ही दूर करु शकणार नाही, असं म्हणताना माझी नाराजी व्यक्त करुन मी याला विरोध करुन थांबतो असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर शिवसेनेच्या या आरोपांना उत्तर देताना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करताना त्यांनी कम्युनिस्ट विचारधारा मारुन शिवसेना वाढवली असं विधान केलं.
त्यांच्या या विधानावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. तसंच विचारधारा मारली हा शब्द प्रयोग का केला तो शब्द मागे घेण्याचा आग्रह धरला. पण लाड आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळं त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघेही ऐकायला तयार नव्हते. अखेर दानवे यांनी आमचा या विधेयकाला विरोध असल्याचं सांगत सर्वांनी सभात्याग केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.