मुंबई : भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे. मात्र, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पत्ता पुन्हा कट झाला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. (Legislative Council Election News)
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजप (BJP) नेतृत्वाने उमेदवारी नाकारली आहे. याविषयी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, केंद्रानं पाच जणांची नावं जाहीर केली. आमच्या पक्षात आम्ही सगळी जण कोरी पाकिटे असतो, जो पत्ता लिहिला जाईल तिथं जात असतो. राजकारणात नेते अन् चाहते इच्छा व्यक्त करत असतात. परंतु, निर्णय हा नेतृत्वानं घ्यायचा असतो. राज्यसभा, विधान परिषद, विधान सभा यांचा निर्णय केंद्रीय पातळीवरून होत असतो. केंद्रानं घेतलेला निर्णय शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो.
पंकजा मुंडेंची उमेदवारी व्हावी, यासाठी देवेंद्र फडणवीसांसह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु, केंद्रानं भविष्यातला विचार केला असावा. पंकजा मुंडे या सध्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. त्यामुळं केंद्राने वेगळा काही तरी विचार केला असेल. पंकजा मुंडे या मध्य प्रदेश सहप्रभारी आहेत आणि त्यांच्याकडं राष्ट्रीय पातळीवरील मोठी जबाबदारीही आहे. त्यामुळं त्यांना आणखी काही जबाबदारी देण्याची केंद्राची कल्पना असेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून बुधवारी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पंकजा मुंडे यांनी आपण विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचं नावही चर्चेत होतं. पण दोघींनाही संधी देण्यात आलेली नाही. पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनाही संधी दिली आहे. दरेकर, लाड व शिंदे यांच्या नावांवर आधीच शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात होते. तिघेही नेते फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात.
परिषदेसाठी 9 जून अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्याने आज यादी जाहीर करण्यात आली आहे. 10 जूनच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 9 ऐवजी 8 जून रोजीच नावे निश्चित होवून अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते (शिवसेना), प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, आर. एस. सिंह (सर्व भाजप), संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे.
विधान परिषदेसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता असणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य कमी निवडून येतील. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 53, शिवसेना (Shivsena) 56 आणि कॉंग्रेसचे (Congress) 44 आमदार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.