मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे (MVA) नेत्यांवर सक्त वसुली संचालनालयाची (Enforcement Directorate) कारवाई सुरू आहे. यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच भाजपचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईतील महापालिकेतील कंत्राटदारांना 'ईडी'ची धमकी दिली आहे. या कंत्राटदारांना ईडीच्या दरवाजात उभे करून चांगलाच इंगा दाखविण्यात येईल, असे शेलार यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली होती. त्यावरून मोठी खळबळ उडाली होती. आता शेलार यांनी कंत्राटदारांना ईडीची धमकी दिल्यामुळे गदारोळ उडाला आहे. स्थायी समितीच्या 7 मार्चच्या बैठकीत नालेसफाईचे प्रस्ताव मंजूर न करता शिवसेनेने नालेसफाई कामांना व मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून दिले आहे, असा आरोप शेलार यांनी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेऊन केला आहे.
याबाबत बोलताना शेलार म्हणाले की, वांद्रे ते दहिसर, कुर्ला ते मुलुंडपर्यंत भाजपच्या खासदार, आमदार व नगरसेवकांनी आठवडाभर नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यात अनेक नाले गाळाने, कचऱ्याने भरलेले तसेच, तुंबलेले आढळले. काही ठिकाणी कंत्राटदारांनी नालेसफाईच्या कामांना सुरुवातही केली नसल्याचे दिसून आले. एका नाल्यात तर एक कचरा वेचक व्यक्ती नाल्यातील गाळावरून चक्क चालत गेल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. नालेसफाईच्या कामांना 15-20 दिवस उशीर झालेला आहे. आतापर्यंत 10 टक्केही नालेसफाईही पूर्ण झालेली नाही. पावसाळा सुरू होइपर्यंत 25 टक्केही नालेसफाईची कामे होणार नसल्याचे दिसत आहे. पावसाळा आधीच सुरू झाल्यास मुंबईची तुंबई होऊ शकते.
नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी कामावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांचा विशेष टास्क फोर्स नियुक्त करावा, अशी मागणीही शेलार यांनी आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली. तसेच, सनदी अधिकाऱ्यांना वातानुकूलित कार्यालयात बसू न देता त्यांना रस्त्यावर उतरून काम करायला लावावे, अशी मागणीही त्यांनी केली. शेलार यांच्या टास्क फोर्सच्या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.