मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मंगळवारी सकाळी फोर सीझन हॉटेलमधील पार्ट्यांचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला होता. या हॉटेलात 15 कोटी रुपयांच्या पार्ट्या होत होत्या, तिथे फडणवीस यांचा भाऊ असायचा, असा आरोप मलिकांनी केला होता. या आरोपांना भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
फोर सीझनमध्ये काय चालायचे याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे होते, असे मलिक म्हणाले होते. त्यावर राणे यांनी तिथे कोण पार्ट्या करतात ते मीच दाखवतो, असे म्हणत आव्हान दिले. फोर सिजन हॉटेलमध्ये काय चालते कोण पार्टीला असतं हे मला सांगायला लावू नका. पार्टी कशी होते, हे त्यांनी त्यांच्या पर्यावरण मंत्र्याला विचारावे, असे सांगत राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बाण सोडला.
नवाब मलिक यांनी परमबीर सिंग परदेशात पळून गेल्याचा उल्लेख करत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यावर बोलताना राणे यांनी पुन्हा आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. सिंग कुणाचा लाडका, तुमची घाण साफ करताना तो हवा होता, अशी टीका करत आदित्य ठाकरे यांना सिंग कुठे आहेत हे माहित नाही का, असा सवाल राणेंनी केला. वर्षा बंगला, महापौर बंगला असेल येथे सगळ्यात जास्त परमवीर सिंग जायचे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत मिटिंग करायचे. तुम्हाला तुमची घाण साफ करायला परमवीर सिंग लागतात मग आता विरोध का करता. परमवीर सिंग यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर त्याच्या ऑफिसमध्ये आदित्य ठाकरे बसून असायचे हे दिसेल. असा दावा राणे यांनी केला.
ईडीने अनिल देशमुख यांना अटक केल्याबाबत राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. फडणवीस यांनी सभागृहात वाझेचा विषय काढला आणि हे सर्व प्रकरण बाहेर आले. फडणवीस हे सिक्सर मारण्यासाठी सक्षम आहेत. ते दिवाळीनंतर बॉम्ब फोडतील, असंही राणे यांनी स्पष्ट केलं. पाच समन्स नंतर देशमुख हजर झालेले आहेत. ज्या पत्राच्या आधारे त्यांना अटक केलेली आहे त्यामध्ये अन्य लोकांची देखील नावे होती. त्यांचीही चौकशी करायला हवी, असे राणे म्हणाले.
देशमुख तुरूंगात दिवाळी साजरी करत असतील तर आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सांताक्लॉज परब देखील ख्रिसमसला तुरूंगात जातील. त्यांना 100 कोटी आम्ही वसूल करायला सांगितले होते का, मलिकांच्या जावयाला आम्ही ड्रग्ज विकायला सांगितले होते का, असे सवाल करत राणे यांनी केले. संजय राऊत आणि नवाब मलिक हे आमच्यासाठी पोषक आहेत. त्यांनी दररोज पत्रकार परिषद घ्यावी, असा टोला राणे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.