

Mumbai News: राज्यात फोडाफोडीचं राजकारण जोरदारपणे सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला लागलेली गळती काय थांबायचं नाव घेताना दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वीच 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केल्याचा धक्का पचवत नाही, तोच आदित्य ठाकरेंच्या जवळचे समजले जाणारे सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. या फोडाफोडीच्या राजकारणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर आता भाजप आमदारानं त्यांना थेट सापाची उपमा दिली आहे.
भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी(ता.1जुलै) माध्यमांशी संवाद साधताना मनसे प्रमुखांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. त्यांनी अधिवेशन काळात विधानसभेत विषारी सापांच्या संदर्भात गंभीर मुद्दा उपस्थित केला होता, त्याचाच संदर्भ करत ज्यावेळी राज ठाकरेंच्या टीकेविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावेळी श्रीगोंद्याचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला. ते म्हणाले, प्रत्युत्तर देताना विक्रम पाचपुते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. माझा आजचा विषय विषारी सापांसंदर्भात आहे, पण मी फुसक्या आणि बिनविषारी सापांबद्दल बोलत नसल्याचा खोचक टोला पाचपुते यांनी ठाकरेंना लगावला.
विधानसभेच्या सभागृहात भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी सर्प दंशानंतरच्या ॲंटी व्हेनमसाठी या औषधाचा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. ते म्हणाले. आपल्याकडे सर्पदंशानंतर एकच औषध दिलं जातं. परंतु प्रत्येक सापाच्या विषाचे परिणाम वेगवेगळे असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी अधोरेखित केला.
तसेच आपल्याला सर्पदंशावरील ॲंटी व्हेनम चेन्नईमधून मिळतं. चेन्नईमधून ॲंटी व्हेनम घेण्यापेक्षा राज्यात एक ॲंटी व्हेनमची बँक तयार केली पाहिजे, अशी भूमिकाही पाचपुते यांनी यावेळी सभागृहात घेतली. तसेच यासंदर्भात रिजनल व्हेनम बँक तयार केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन पुन्हा एकदा कडाडून टीका करतानाच भाजपला लक्ष्य केलं होतं. तसेच त्यांनी पक्षांतर करणाऱ्या आमदार-खासदारांनाही झोडपलं होतं. त्यांनी यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते घाणेरडं आणि भयानक असल्याचं म्हटलं.
तसेच सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहेत. हे देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं तयार आहेत.पण भविष्यात या सगळ्याचे परिणाम भाजपलाही भोगावे लागतील, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली होती.
त्यावर भाजप आमदार राम कदम यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना इशारा दिला आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंचे विधान आहे, त्यात हक्कभंग होऊ शकतो, त्यांचे विधान विशेषाधिकाराचे हनन करणारे आहे. मनात त्यांच्याबद्दल आदर आहे, मी हक्कभंग टाकणार नाही, मात्र विधान तसं आहे, असं कदम यांनी सांगितलं.
तसेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा छळ केला, म्हणून त्यांनी पक्ष सोडल्याचा आरोपही राम कदम यांनी यावेळी केला. तसेच उद्धव ठाकरेंनी परिस्थिती निर्माण केली म्हणून पक्ष सोडावा लागला होता. स्वत:चं घर सांभाळता येत नाही, यात भाजपचा संबंध येतो कुठे? अशी खोचक विचारणाही कदम यांनी मनसे अध्यक्षांकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.