
Maharashtra Political News: रायगड जिल्हा म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा एकेकाळचा हक्काचा बालेकिल्ला होता. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने प्रत्येक ठिकाणीच आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. यात रायगड जिल्ह्यातील शहरी तोंडवळा असलेल्या क्षेत्राचाही समावेश आहे.
इथल्या एका एका महत्वाच्या शिलेदाराला भाजपने गळाला लावल्याने पेण, पनवेल, उरण या भागात शेकापला काही दिवसांपासून जोरदार हादरे बसत आहेत. त्याचवेळी अनेक पक्षप्रवेश पार पडल्याने भाजपचीही इथली ताकद कमालीची वाढली आहे. पण इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तिकीट वाटप करताना पक्ष नेतृत्वाच्या नाकी नऊ येणार आहे.
पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 ला स्थापना झाली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी 2017 ला महापालिकेची निवडणूक पार पडली. यात पनवेलकरांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. 83 पैकी 54 नगरसेवक निवडून आल्याने भाजपने दणदणीत विजय मिळवला.
तर कधीकाळी एकहाती सत्ता उपभोगलेल्या शेकापला अवघ्या 25 जागांवर समाधानी रहावे लागले. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले. त्यावेळी महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. त्यानुसार डॉ. कविता चौतमोल यांना संधी देण्यात आली. शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे विरोधी गटामध्ये बसले.
आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसोबतच पनवेल महापालिकेचीही दुसरी निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे भाजपने इथे पक्षाची यंत्रणा मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह केली आहे. यापूर्वी पक्षात आलेल्या आणि स्थिरावलेल्या नेत्यांना शेकापमधील इतर महत्वाच्या शिलेदारांनाही गळाला लावण्याची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जाते.
त्यामुळे शेकापला अक्षरशः सुरुंग लागला आहे. नुकतेच शेकापचे ज्येष्ठ नेते, पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला आगामी पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षातील प्रत्येक खाचाखोचा माहिती असलेला आणि कार्यकर्त्यांमध्ये उठबस असलेला नेता गळाला लागला आहे.
मागील काही वर्षांत पेणमधून रवीशेठ पाटील, धैर्यशील पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज रवीशेठ पाटील भाजपचे आमदार आणि धैर्यशील पाटील राज्यसभेवर खासदार आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि विद्यमान भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पनवेल आणि उरणमध्ये शेकाप अस्तित्वहिनच झाला.
सत्तेत असणारा पक्ष थेट विरोधी पक्षात बसू लागला. याच प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेच्या स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. महापालिका झाल्यानंतर त्यांनी सत्ताही स्थापन केली. उरणचे शेकापचे खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विवेक पाटील यांनी राजकीय संन्यास घेतल्यानंतर मधल्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली.
काहीच दिवसांपूर्वी सुभाष पाटील आणि आस्ताद पाटील यांनीही साथ सोडली आहे. तर आता शेकापचे ज्येष्ठ नेते, पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रीतम म्हात्रे हे पनवेल महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते होते. शिवाय त्यांनी गत विधानसभेची निवडणूक लढवली होती.
पण त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. आता त्यांच्यासोबत जवळपास 15 माजी नगरसेवकांनीही कमळ हाती घेतले. या घडामोडींचा पनवेल महानगरपालिका आणि उरण, पेण नगरपालिकेतील सत्ता समीकरणांवरही मोठा परिणाम होणार आहे. शिवाय जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.