
Eknath Shinde Vs Ganesh Naik : ठाणे जिल्ह्यात सुरु असलेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप नेते, वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून येणार आहे. याला कारण ठरणार आहे ते नवी मुंबई महापालिकेची निवडणूक. येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेतही हालचाली सुरू झाल्या आहेत. पण 2015 मध्ये 111 प्रभाग असणाऱ्या महापालिकेत आता 14 गावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे प्रभाग रचनाही याच गावांसह करून त्यानुसार आरक्षण सोडत करावी लागणार हे जवळपास निश्चित आहे.
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी आग्रहाने या 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका हद्दीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतची अधिसूचनाही सप्टेंबर 2022 मध्ये निघाली होती. या निर्णयावर घेण्यात आलेल्या आक्षेपांवर मार्च 2024 मध्ये सुनावणी झाल्यानंतर या गावांचा महापालिका हद्दीतच समावेश होणारच या निर्णयावर शिंदे यांनी शिक्कामोर्तब केला होता. पण या 14 गावांच्या समावेशाला गणेश नाईक यांचा विरोध आहे. लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर त्यांनी याबाबत शिंदे यांच्यावर जाहीर आरोप करून हा विरोध दर्शवला होता.
राजकीयदृष्ट्या या निर्णयाचा फायदा शिंदे यांना होऊ शकतो का? तर त्याचे उत्तर हो आहे. ही 14 गावे एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येतात. तर शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात येतात. या भागात श्रीकांत शिंदे आणि शिवसेना यांची मोठी ताकद आहे. अशातच या 14 गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्याने इथले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील मतदानही नवी मुंबई महापालिकेमध्ये जाणार आहे.
या मतदानाचा फायदा शिवसेनेला महापालिका निवडणुकीत स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी होऊ शकतो. शिंदे यांनी मागील काही दिवसांपासून नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश घडवून आणले आहेत. आजघडीला त्यांच्याकडे जवळपास 54 माजी नगरसेवक आले आहेत. शिंदे आणि नाईक यांचे ठाणे जिल्ह्यातील वैरही सर्वश्रृत आहे, दोघेही एकमेकांना कोंडीत पडकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच शिंदे यांनी महापालिका निवडणुकीतही आक्रमक धोरण कायम ठेवल्याने या दोघांमधील वाद पुन्हा उफाळून येऊ शकतो.
नाईक यांनीही शिवसेनेला फायदा व्हावा म्हणूनच ही गावे नवी मुंबईला महापालिकेला जोडल्याचा आरोप केला होता. कारण भौगोलिकदृष्ट्या या गावांचा आणि नवी मुंबई महापालिकेचा संबंध येत नाही. या गावातील नागरिकांना एका बाजूने नवी मुंबईला यायचे झाल्यास, ठाणे महापालिकेचे काही प्रभाग ओलांडून यावे लागते तर दुसऱ्या बाजूने गेल्यास पनवेल महापालिकेची हद्द ओलांडून यावे लागते. मग तरीही या गावांना नवी मुंबई महापालिकेला जोडण्याचा हट्ट का? असा सवाल नाईक यांनी केला होता.
तसेच या गावांचा विकास झालेला नाही. पाणी पुरवठा, ड्रेनेज सिस्टिम, पार्किंग या सोयीसुविधांचा अभाव आहे. या गावांमध्ये अनधिकृत बांधकामे आहेत, अनधिकृत गोदाम आहेत. अनधिकृत भंगारवाले फिरत असतात, मग या गावांच्या विकासाचा भार नवी मुंबईतील करदात्यांनी का सोसावा? असाही सवाल नाईक यांनी विचारला होता. त्यामुळे आधी या गावांचा विकास करावा आणि मगच निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. या पत्रावर अद्याप कोणीतीही भूमिका घेतलेली नाही.
त्यामुळे या 14 गावांसह आता नव्याने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडवणूक होणार आहे. याचा थेट फायदा शिवसेनेला होऊ शकतो. यावर आता गणेश नाईक कशी रणनीती आखतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.