लोकसभेला जागावाटपामुळे शिवसेनेसह भाजपला मोठा फटका बसला होता. तिच चूक टाळून विधानसभेला लवकर जागावाटप होण्यासाठी महायुतीतील शिवसेना ( शिंदे गट ), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा पवार ) आग्रही आहे.
मात्र, महायुतीत अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष सामील झाला आहे. तसेच, तीनही पक्षांकडून अधिकच्या जागांची मागणी होत असल्यानं जागावाटपाचा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) रविवार आणि सोमवार असे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. मुंबई दौऱ्याचा समारोप करून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शाह यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
विधानसभेला सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप ( bjp ) 150 ते 160 जागा लढवू इच्छितो आहे. तर, अजितदादांची राष्ट्रवादी 70 जागा लढविण्यावर ठाम आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून 80 जागांवर दावा करण्यात येत आहे. तीनही पक्षांकडून वेगवेगळे दावे सांगण्यात येत असल्यानं महायुतीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी झालेल्या बैठकीत राज्य भाजपच्या नेतृत्त्वानं गृहमंत्री शाह यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. त्यात 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, असं राज्य भाजपच्या नेतृत्त्वानं म्हटलं आहे. भाजपनेच गृहमंत्री शाह यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवल्यानं महायुतीतील तीन पक्षांत मैत्रीपूर्ण लढत होणार का? गृहमंत्री शाह या प्रस्तावाला मान्यता देतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
त्यासह जागांची अदलाबदल, महायुतीतील घटकपक्ष, महामंडळाचे वाटप आणि विधानपरिषदेच्या जागा आणि ओबीसी समाजावर विशेष लक्ष्य केंद्रीत करण्यावरही गृहमंत्री शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
जागावाटप दिल्लीत...
"आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुती बळकट कशी करता येईल, याची चर्चा झाली. अमित शाह यांनी सकारात्मक मार्गदर्शन केले. जागावाटपाच्या संदर्भात चर्चेत नेमक्या जागा किती मिळतील वगैरे चर्चा झाली नाही. मात्र, जे काही जागावाटप होईल, त्यात निश्चितपणे सन्मापूर्वक जागावाटप होईल," असं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.