

Mahayuti setback : राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ जानेवारीला मुंबईत येणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका-एका जागेसाठी भाजप-शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना व मनसेमध्ये चुरस असणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता उलटून गेली असून आज अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अनेकांना झटका बसला आहे. मुंबईत भाजप-शिवसेना युती दोन प्रभागांतून निवडणुकीआधीच बाहेर पडली आहे. युतीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. या प्रभागांमध्ये ठाकरेंच्या उमेदवारांचे पारडे आता जड झाले आहे.
प्रभाग क्रमांक २११ आणि प्रभाग क्रमांक २१२ मध्ये भाजप किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असणार नाहीत. प्रभाग २११ मध्ये कागदपत्रांची पुर्तता होत नसल्याने युतीच्या उमेदवाराला अर्ज दाखल करता आला नाही. तर प्रभाग २१२ मध्येही अशीच स्थिती उद्भवली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी खामगर यांना पक्षाने एबी फॉर्म दिला होता. मात्र, त्या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकल्या नाहीत. त्यांचा अर्ज उशिरा दाखल झाल्याने तो बाद झाला आहे.
निवडणुकीआधीच दोन प्रभागांमधून युती आऊट झाल्याने नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता ठाकरेंच्या उमेदवारांना बाय देणार की अपक्ष उमेदवारांना ताकद देत ठाकरेंना जेरीस आणणार, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे. मुंबईत अनेक प्रभागांमध्ये भाजपमधील नाराज कार्यकर्त्यांनीही अर्ज दाखल केला आहे. दोन प्रभागांमध्ये बंडखोरांचे अर्ज असल्याने भाजपकडून त्यांनाच ताकद दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईत जवळपास ३० प्रभागांमध्ये भाजपच्या बंडखोरांनी अर्ज दाखल केल्याचे समजते. अर्ज छाननीची मुदत संपल्यानंतर पक्षाकडून या बंडखोरांची समजूत काढली जाणार आहे. त्यांना मतविभागणी टाळण्यासाठी बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्याचे आव्हान नेत्यांसमोर असणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.