

Bombay High Court Dia Mirza video : फटाके न फोडण्याचे आवाहन करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे ओढले आहे.
हटवलेला व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचे BMCला आदेश केला. उच्च न्यायालयाच्या या आदेशाचा मुंबई भाजपचे शहराध्यक्ष आमदार अमित साटम आणि महापौर रितू तावडे यांना जोरदार दणका बसला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडिओवर टीका करणाऱ्या भाजप (BJP) नेत्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, असे आवाहन दिया मिर्झाने या व्हिडिओच्या माध्यमातून केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) दिया मिर्झाची मदत घेत हा व्हिडिओ तयार केला होता. मात्र, भाजप नेत्यांनी या व्हिडिओला विरोध केल्यानंतर मुंबई महापालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो हटवला होता. यावरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला होता.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणीदरम्यान काही राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. "काही राजकारण्यांनी केलेल्या अनाठायी टिप्पण्यांमुळे आम्ही अस्वस्थ आहोत," असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. तसेच, "भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे," याचीही न्यायालयाने राजकीय नेत्यांना आठवण करून दिली. याशिवाय, मुंबई महापालिकेने (BMC) हटवलेला दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर अपलोड करावा, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अभिनेत्री दिया मिर्झा यांचा जनजागृतीचा व्हिडीओ भाजपच्या दबावानंतर BMCने हटवला होता. दिवाळी कशी साजरी करायची, हे दिया मिर्झाने आम्हाला शिकवू नये, असे मुंबई भाजप शहराध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले होते. यापाठोपाठ भाजपच्या महापौर रितू तावडे यांनी, दिया मिर्झा यांची भूमिका हिंदू विरोधी राहिल्याचे म्हणत, आगपाखड केली होती.
हिंदूंनी दिवाळी कशी साजरी करावी, हे शिकवण्यासाठी आम्हाला दिया मिर्झा यांची अजिबात गरज नाही. आम्हाला आमची दिवाळी कशी साजरी करायची, हे चांगलेच माहीत आहे. तुम्ही तुमच्या निवडक अजेंड्यावर लक्ष केंद्रित करा. तुमचा विरोध हिंदुत्वाला असल्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्या व्हिडिओला विरोध केला, असे महापौर रितू तावडे यांनी म्हटले होते.
हा व्हिडीओ हटवल्यानंतर मुंबई महापालिकेतील भाजपविरोधात एकनाथ शिंदे शिवसेना मित्रपक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, काँग्रेस, समाजवादी पार्टीसह सर्वच विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. मुंबई काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी, भाजप द्वेषाचे आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे विकृत राजकारण करत आहे. सत्ताधाऱ्यांच्या भेदभावाच्या या भूमिकेला महापालिका आयुक्त देखील बळी पडल्या आहेत. सनदी अधिकारी म्हणून कारभार पाहाताना भारतीय संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली होती. समानता आणि धर्मनिरपेक्षतेच्या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या भेदभावपूर्ण कृतीची जबाबदारी निश्चित करून आयुक्तांना पदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणीही केली होती.
मुंबई महापालिकेतील सत्तेत सहभागी असलेले एकनाथ शिंदे शिवसेनेने दिया मिर्झा यांची पाठराखण केली आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी, अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या आवाहनात काहीही चुकीचे नसल्याचे म्हणत भाजपची कोंडी केली होती. भिवंडीमधील आमदार रईस शेख यांनी, मुंबई महापालिका ही नागरी संस्था आहे, भाजपचे पक्ष कार्यालय नाही, असा टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.