Maratha Reservation Issue And Obc Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दोन वेळा उपोषण केलं. आक्रमक झालेल्या मराठा समाजाला रोष शमवण्यासाठी अखेर राज्य सरकारने निजामशाहीत कुणबी जातीच्या नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास होकार दिला, पण आता ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला आहे.
मराठा समाजातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देताय तर मग नेमलेली समिती काय कामाची आहे? मराठ्यांना तुम्ही मागच्या दाराने प्रवेश देत आहात. कायद्यानुसार त्यांना आरक्षण द्या. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. यामुळे हे सर्व कायद्याविरोधात आहे. महाराष्ट्र हा सर्व समाजाचा आहे. हे मराठा नव्हे तर मराठीचं राज्य आहे. सर्वांना घेऊन पुढे जायला हवं. यामुळे राज्यकर्त्यांनी या सर्व बाबींचा विचार करावा. जनतेला समजत नाही, अशा गैरसमजात राहू नका. एकीकडे पोलिसांना हतबल करायचं आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र द्यायचं हे अयोग्य आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ओबीसी आरक्षण यामुळे धोक्यात आलं आहे. यात भटके विमुक्तही आहेत. गरीब आहेत. धनगर, माळींसह प्रचंड मोठा समाज आहे. आणि त्यांचं आरक्षण संपण्याचा घाट हा गेल्या काही दिवसांपासून घातला जात आहे. आणि त्याला वेगवेगळ्या स्तरावरचे लोक जबाबदार आहेत. अगदी मंत्रालयापासून ते खालपर्यंत सर्वच जबाबदार आहेत. ओबीसींचं आरक्षण घालवण्याचं हे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. ( maratha reservation issue in maharashtra )
या विरोधात आवाज कोणी उठवत नाही. आज एवढी दहशत निर्माण झाली आहे की लोक बोलायलाही घाबरत आहेत. आमदारांची नेत्यांची घरं, दारं जाळली जात आहेत. यामुळे कोण बोलायची हिंमत करत नाही. जे मतांसाठी असे निर्णय घेत असतील, तर त्यांना ओबीसींची मतं नकोयत का? भुजबळांना मतं देऊ नका, अशा धमक्या दिल्या जात आहेत. असाच विचार ओबीसींनी केला तर? हे विसरू नका आणि मतांसाठी हे सगळं घडतंय का? ओबीसी नेत्यांना छळायचं असेल, त्यांच्या नेत्यांवर हल्ले होत असतील तर हा विचार वाढीला लागू शकतो, असा इशारा भुजबळांनी दिला.
हे असंच सुरू राहिलं तर ओबीसींचं आरक्षण संपवलं तर कोणी व्यक्ती असू दे किंवा पक्ष असू दे आम्ही त्यांना सावधानतेचा इशारा देतोय. ओबीसी समाज लहान आहे, गरीब आहे म्हणून त्यांना काही समजत नाही, असा गैरसमज करून घेऊ नका. आणि म्हणून माझीही एक मागणी. ही मागणी शरद पवार, अजित पवार, भाजप, काँग्रेस यांनी केली आहे. आणि ही मागणी आहे जातीनिहाय जनगणनेची. जातीनिहाय जनगणना करा आणि ओबीसी किती आहेत आणि इतर समाजाची संख्या किती आहे ते कळू द्या. बिहारमध्ये झाली. आता राज्यात करा, असं भुजबळ म्हणाले.
काही लोकांच्या डोक्यात भ्रम आहे, ओबीसींमध्ये लहान लहान जाती आहेत. पण मी कुठल्या जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. मी ३७५ लहान जातींचं प्रतिनिधित्व करायला उभा आहे. त्यात धनगर आहे, वंजारी, तेली, माळी, कुणबी, लोहार आणि भटके विमुक्तही आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.