Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामिनानंतर ते नुकतेच तुरुंगाबाहेर आले आहेत. आता मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची वाट धरणार की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याविषयीच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे. पण दुसरीकडे नवाब मलिकांच्या भेटीला राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाच्या नेत्यांची वर्दळ पाहायला मिळत आहे.
याचवेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनीदेखील मलिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आमच्या दोघांची डिग्री सेम आहे 'रिटर्न फ्रॉम जेल' अशी मिश्किल टिप्पणी देखील भुजबळांनी केली.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नवाब मलिक(Nawab Malik) आमचे सहकारी आहेत. आमच्या दोघांच्या डिग्री आरएफजे म्हणजे 'रिटर्न फॉर्म जेल' आहे. आमचा सहकारी आजारी आहे. किडिनीचे प्रॉब्लेम वाईट असतात, ते जेलमध्ये हाताळणे कठीण आहे. आम्ही त्यांना आधी तब्येत सांभाळण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी यथावकाश निर्णय घ्यावा असेही भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले, नवाब मलिकांची आधी प्रकृती तरी बरी होऊ द्या. त्यानंतर कुठे जायचं आणि कुणाबरोबर जायचं? हे तेच ठरवतील. त्यांना मूत्रपिंडाचा फार मोठा आजार बळावला आहे. त्यामुळेच त्यांना दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. त्यांना आधी नीट तरी होऊ द्या, ते बरे झाले तरच राजकारणात काम करू शकतील. त्यानंतर कुठे जायचं? हे तेच ठरवतील. पण ते फार लांब कुठे जाणार नाहीत, ते इकडेच राहतील असेही ते म्हणाले.
''...म्हणून पवारसाहेब रागात बोलले असतील !''
शरद पवार(Sharad Pawar) यांचा फोटो वापरण्यावर भुजबळ म्हणाले की, आमची पार्टी एकच आहे. कदाचित पवारसाहेब रागात बोलले असतील. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत ना? माझ्या मंत्रालयाच्या कार्यालयात त्यांचा मोठा फोटो आहे. ते आमचे नेते आहेत. आम्ही त्यांना मानतो, म्हणून प्रेमाने आम्ही त्यांचा फोटो लावला. हा काही गुन्हा आहे, असे मला वाटतं नाही. पवारांची भाजपसोबत न जाण्याची भूमिका आधीपासूनच आहे, बाकी वावड्या मीडियात होत्या असेही भुजबळांनी यावेळी सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.