Sharad Pawar Beed Sabha: "अजित पवारांच्या पक्षातील बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ८३ व्या वर्षीही तरुणाला लाजवेल या उत्साहाने पुन्हा अधिक अॅक्टिव्ह झाले आहेत. अजित पवारांबरोबर गेलेल्या पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात त्यांनी सभा घेण्यास सुरवात केली असून बीडची ही त्यातील दुसरी सभा आहे.
बीडच्या सभेची जय्यत तयारी झाली असून त्यावर शेवटचा हात फिरवल्यानंतर या सभेचा टीझर आज लाँच करण्यात आला. त्यात तीच उर्जा, तीच उमेद बाळगून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, शेतकरी व कष्टक-यांच्या भल्यासाठी झटणा-या पवारसाहेबांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीडमध्ये पारस नगरी, माने कॉम्प्लेक्सजवळ दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे. पण, त्यापूर्वीच दोन्ही गटांकडून मोठी बॅनरबाजी झाल्याने त्याचीच सध्या चर्चा आहे.
अजितदादा हे छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदींच्या आपल्या गटासह भाजप,शिवसेनेच्या राज्यातील सरकारमध्ये २ जुलैला सामील झाल्यानंतर शरद पवारांनी सहाच दिवसांत भुजबळांच्या येवल्यात जंगी सभा घेतली होती. त्यानंतर आता ती ते मुंडे यांच्या बीडमध्ये उद्या घेत आहेत. येवल्यात पवारांनी भुजबळांवर तिखट हल्ला चढवला होता.त्यामुळे बीडमध्ये ते धनूभाऊंवर थेट शरसंधान करणार का, याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. फर्डे वक्ते आणि राष्ट्रवादीची धडाडती तोफ असलेले धनूभाऊ हे दोन्ही पवारांचा हुकमी एक्का म्हणून ओळखले जातात.
वस्तुस्थिती मांडण्यासाठी पवार या सभा घेत आहेत. बीडनंतर अजितदादांबरोबर गेलेल्या कुठल्या नेत्याच्या मतदारसंघात ते ही सभा घेणार याचे अंदाज आताच बांधण्यास सुरवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यानंतर आता ती विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र की कोकणात असणार याविषयी तर्क लढवले जात आहेत. तर, ती विदर्भात होईल आणि या सभा सत्राची सांगता पश्चिम महाराष्ट्रात होईल,असा जाणकारांचा अदाज आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.