Mumbai : राज्यात शिंदे-भाजप सरकार सत्तेत येऊन आता वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, या सरकारच्या रखडलेल्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे शिंदे गटासह भाजपच्या गोटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे, काही आमदारांनी तर मंत्रिमंडळ विस्ताराराला तारीख पे तारीख मिळत असल्यानं उघडउघड नाराजीही बोलून दाखवली आहे. याचदरम्यान, आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी(दि.२९) तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार(Cabinet Expansion) तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या खासदारांना संधी मिळण्याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.
आषाढी एकादशीची पंढरपूर येथील शासकीय पूजा सपत्निक पार पाडून आणि सर्व विधी संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) प्रथम मुंबईला पोहोचले आणि मुंबईतून ते दिल्लीसाठी रवाना झाले. यावेळी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विमानतळावरच काही मिनिटे चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीकडे रवाना झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah)यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी(दि.२९) रात्री उशिरा भेट घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. संभावित शिंदे गटाकडून कोण मंत्री होऊ शकतात? कोणत्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल? अशा स्वरुपातील चर्चा या भेटीदरम्यान होऊ शकते आणि त्यासाठीच शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची बुधवारी(दि.२८) दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक बदल आणि केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचा विस्तार होणार आहे आणि त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी शिंदे दिल्लीला पोहचल्याची माहिती मिळत आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.