Mumbai News: कांद्याचे भाव गडगडल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने धाव घेत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच तब्बल दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दर देण्याचीही घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली असून कांद्याच्या दराबाबत आणि नाफेडच्या खरेदी केंद्रांमध्ये आणखी वाढ करण्याच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्यानंतर आता केंद्र सरकार ऑक्टोबरपासून साखर निर्यातीवरही बंदी घालणार असल्याची चर्चा आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी कांद्याच्या प्रश्नावर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत शेतकऱ्यांना धीर दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांवर कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
याबरोबरच आणखी नाफेडची कांदा खरेदी केंद्र वाढविण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री आणि केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना विनंती करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विटद्वारे सांगितले आहे. त्यामुळे नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रांत आणखी वाढ होण्याची शक्यता असून यावर केंद्र सरकार काय निर्णय घेते हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.
राज्यातील कांद्याच्या मुद्यांवर राजकारण तापलेलं असतानाच गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत अजून काय ठोस उपाययोजना राज्य सरकारच्यावतीने करण्यात येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.