
Ahilyanagar News : ऐतिहासिक वारसा असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या चौंडी जन्मगावाच्या सर्वांगीण विकासासाठी 681 कोटीचा विशेष विकास आराखडा राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (ता.6मे ) झालेल्या बैठकीत (Cabinet Meeting) मंजूर करण्यात आला. याशिवाय नगर जिल्ह्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, मुलींसाठी आयटीआय, राहुरी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय, नगर महापालिका क्षेत्रात सांस्कृतिक केंद्र, असा विकासाचा वर्षाव जिल्ह्यावर करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांच्या आग्रहाने राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक चौंडी येथे झाली. त्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी परकीय आक्रमणांनी देशातील श्रद्धास्थाने नष्ट केली होती, त्यांचे पुनरुजीवन पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केले. तोच विचार राज्य सरकारने प्रेरणास्थान मानून अहिल्यादेवींचे जन्मस्थळ चौंडी हे स्मृतिस्थळ म्हणून त्याचे जतन व संवर्धनासाठी 681 कोटींचा विशेष विकास आराखडा मंजूर केला आहे.
याचबरोबर अहिल्यादेवींनी जसा भारतातील श्रद्धा स्थानांचे पुनर्जीवन केले, त्याच पद्धतीने राज्यातील श्रद्धास्थानांचे विकास करण्याचे सरकारने ठरवले आहे यामध्ये अष्टविनायक गणेश विकास प्रकल्पाला 147 कोटी, तुळजाभवानी विकास प्रकल्पाला 1865 कोटी, ज्योतिबा मंदिर विकासासाठी 259 कोटी, त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी 275 कोटी, महालक्ष्मी मंदिरासाठी 1445 कोटी व माहूरगड विकासासाठी 829 कोटी असे सर्व मिळून 5503 कोटीचा विकास प्रकल्प मान्यता देण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त राज्य सरकार अहिल्यादेवीचे जीवन व कार्य, यावर बहुभाषीय कमर्शियल चित्रपट निर्मिती आधुनिक तंत्रज्ञान वापरून करणार. तो फक्त त्यांचा जीवनपट नसेल तर त्यांच्या कार्याची प्रभावी मांडणी करणार असेल. अहिल्यानगर जिल्ह्यात स्वतंत्र अहिल्यादेवी होळकर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यभरात मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय करणार असून, त्याची उरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातून करत आहोत. अहिल्यादेवींच्या नावाने महिला सक्षमीकरण उपक्रमात आदिशक्ती अभियान राबवणार व या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला व स्वयंसेवी संस्थांना आदिशक्ती पुरस्कार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांतून शिक्षण उपक्रमांतर्गत दहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देणार असून, यासाठी यशवंत अभियान राबविण्यात येणार आहे. मॅट्रिक नंतरचे शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारकांना प्रत्येक विभाग स्तरावर वस्तीगृह योजना सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. यासाठी पुणे व नागपूर येथे अशी पहिली हॉस्टेल्स सुरू होतील व नंतर प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजाच्या मुलांना व मुलींसाठी स्वतंत्र होस्टेल होतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
राहुरी येथे वरिष्ठ सर दिवाणी न्यायालय उभारण्यात येईल. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याच्या संचालनासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा मंजूर केला असून त्यानुसार या प्राधिकरणाला सर्व अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त स्वतंत्र लोगो तयार करून तो वर्षभर वापरला जाणार आहे स्वतंत्र पोस्टाचे तिकीट व विशेष प्रेरणा गीतही जारी करण्यात आले आहे. अहिल्यादेवींनी विहिरी व पाणी वाटप प्रणालीचे जतन केले असल्याने या निमित्ताने जलसंधारण विभागामार्फत विशेष पुनरुज्जीवन व जतन प्रकल्प चांदवड, त्र्यंबकेश्वर व जेजुरी येथे राबवला जाणार आहे. त्याशिवाय 19 विहिरी, सहा घाट, सहा कुंड व 34 जलाशयांचे संवर्धन केले जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.