संदीप पंडित
Virar : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपसह सर्वच राजकीय प्रमुखांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांनी राज्यासह, जिल्हा, तालुका पातळीवर नेतृत्वाचे बदलाचे वारे वाहू लागले आहेत. वसईमध्येही काँग्रेस आणि भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
वसई विरार काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या चार वर्षांपासून ओनील अल्मेडा हे काम पाहत आहेत. लोकसभा आणि विधानसभेसह येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आता काँग्रेसमध्येही फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस पक्षानं आपला ख्रिश्चन मतदार डोळ्यासमोर ठेवून गेल्या दोन टर्ममध्ये अध्यक्षपदाची माळ ख्रिश्चन धर्मीय उमेदवारांच्या गळ्यात घातली होती. आता मात्र त्यात बदल व्हावा अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.
जिल्हाध्यक्षपदाच्या चर्चेत माजी नगरसेवक राजू गव्हाणकर, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुलदीप वर्तक आणि ग्रामीणचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर दुसर्या बाजूला पुन्हा ओनील अल्मेडाच अध्यक्ष व्हावेत यासाठी प्रदेश पातळीवरील नेता आग्रही असल्यानं काँग्रेस(Congress) नेतृत्व कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पालघर जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्व बदलाचे वारे...
पालघर जिल्ह्यात भाजपची झालेली पीछेहाट त्यातही वसई(Vasai)मध्ये बॅकफूटला गेला असल्याने आता पक्षात जिल्हा नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. भाजप यावेळी आक्रमक आणि नव्या चेहऱ्याला संधी देण्याचे धोरण अवलंबिणार असल्याचं संकेत मिळत आहेत. त्यातही भाजपने अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या काही नेत्यांना विधानसभा प्रमुख केल्यानं त्यांचा पत्ता आपोआप मिटला आहे.
यामध्ये विद्यमान अध्यक्ष राजन नाईक,मनोज पाटील यांचा समावेश आहे. आता जिल्हाध्यक्ष पदाच्या रेस मध्ये नवघर माणिकपूर मंडळ अध्यक्ष उत्तम कुमार, पूर्व पट्टीतील युवा नेतृत्व राजेंद्र म्हात्रे, माजी नगरसेवक किरण भोईर आणि श्याम पाटकर यांची नावे चर्चेत आहेत.
महानगरपालिका निवडणुकीत गेल्या १३ वर्षात भाजप(BJP)ला २ अंकी आकडा गाठता आलेला नाही तर वसई तालुक्यातील तीन विधानसभा मतदारसंघात त्यांचा आमदार ही निवडून आणता आलेला नाही. त्यामुळे यावेळी मात्र भाजपनं लोकसभा,विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आपली तयारी सुरु केल्याने त्यातील पहिला टप्पा म्हणजे जिल्हाध्यक्षपद हे मानले जात आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी कोणाची नेमणूक भाजप पक्षनेतृत्व करतं याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.