Pune News : आळंदी येथून रविवारी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान ठेवले. या वारी सोहळ्याला गालबोट लागले आहे. वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर संतापले आहेत . ते माध्यमांशी बोलत होते.
आळंदीमध्ये वारकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये काही वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांची तसेच महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. भाजपने धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी टोळी निर्माण केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, "आळंदी येथे इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर निर्घृण लाठीमार झाला. ज्या पद्धतीने ते चित्र पाहिले तेव्हा पोलिसांच्या अंगामध्ये औरंगजेब संचारला होता. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो की, महाराष्ट्रात औरंग्याची औलाद कशी निर्माण झाली, जी आम्ही काल पाहिली. त्यांच्या राजवटीत ते दिसून आले. या घटनेला जबाबदार पूर्णतः भारतीय जनता पक्ष आहे,"
"आळंदीच्या वारीचे नियोजन राजकीयदृष्ट्या आपल्या हातात असावे, देवळात कोणी जावे, कसे जावे, किती लोकांनी जावे याचे राजकीय नियंत्रण भाजपचे काही बोगस आचार्य, प्राचार्य, दुराचार्य हे तिथे बसून करत होते. यामधून वारकरी आणि पोलिसांत वाद झाला. या ठिकाणची परंपरा, संस्कृती ही वारकऱ्यांची आहे, राजकीय ठग्यांची नाही," अशी टीका राऊतांनी केली आहे.
"पंढरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता आहे. अख्ख्या जगामध्ये या वारीचा सन्मान केला जातो. वारकऱ्यांचे नियोजन, संयम, शांतता, शिस्त अशी वारी असते. वारकऱ्यांवरील हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरील आणि अस्मितेवरील हल्ला आहे," असे राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांची फेसबूक पोस्टवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. पवारांनी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीवर टीका केली आहे.
"अशी घटना विरोधी पक्षाचं सरकार असताना घडली असती तर भाजपने आणि त्यांच्या कथित अध्यात्मिक आघाडीने तांडव केलं असतं. शिवाय केवळ राजकारणासाठी अध्यात्माचा वापर करणाऱ्यांना अध्यात्माची खरी संस्कृती कशी कळणार? हाही प्रश्न आहेच." असे म्हणत रोहित पवारांनी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीवर निशाणा साधला.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.