
BJP Mahayuti Government Mumbai Floods : पहिल्याच मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड करताना, भुयारी मेट्रो मार्गाबाबत ‘एमएमआरडीए’चा अहवालाकडे लक्ष वेधलं. काही लोकांच्या हट्टापायी हा प्रकल्प राबवला, त्याचे परिणाम भोगत आहोत, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
राज्यात सर्वदूर पहिल्याच पावसाने दाणादाण उडवली. मुंबई तुंबली. अनेक प्रकल्पांमध्ये पाणी शिरले. मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्याने त्यावरून कोलमडलेली प्रशासकीय व्यवस्था आणि त्यावर अंकुश ठेवणारी राज्य व्यवस्था, याचा कारभार उघडला पडला. राज्य सरकारच्या दिखाऊ कारभारावर विरोधक तुटून पडले आहेत. सत्ताधारी भाजप महायुती (Mahayuti) सरकार यामुळे बॅकफूटवर जात शांत बसून घेण्याचे धोरण अवलंबले आहे. मुंबईत साचलेल्या पाण्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत, भाजप आणि एकनाथ शिंदे यांना चांगलेच टार्गेट केले.
'कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईत (Mumbai) जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा ‘एमएमआरडीए’चा अहवाल असतानाही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबविला. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. 25 वर्षे भाजप-शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती. एकनाथ शिंदे सातत्याने नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. मग या काळात भाजप व एकनाथ शिंदे यांनी काय केले?', असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या मुसळधार पावसामुळे राज्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. दुसरीकडे राज्याचे मंत्रिमंडळ, मात्र केंद्रीय अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न आहे. पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून सरकारने नुकसानग्रस्तांना एकरी 20 हजार रुपये मदत तातडीने द्यावी,’ अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा करण्यात आले. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे". अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत, अशी मागणी देखील सपकाळ यांनी केली.
दुसरीकडे महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर अमित शाह एक शब्दही बोलले नाहीत. आता दिल्लीला जाण्यापूर्वी तरी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून जावे. कारण राज्यातील सरकार अमित शाह यांच्या शब्दाशिवाय कामच करीत नाही,’ असा टोमणाही सपकाळ यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.