
Ratnagiri News : ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी विधीमंडळाच्या अंदाज समितीमधील आमदारांना पाच कोटींचे वाटप होणार असा दावा करत आरोप केला होता. तसेच त्यांनी दावा केलेल्या खोलीतच एक कोटी 84 लाख रुपये खोलीत सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच टीकेची झोड विरोधकांनी उडवून दिली होती. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका करताना थेट विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांनाच खरमरीत पत्र लिहलं आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
भास्कर जाधव यांनी, धुळे विश्रामगृहातील कोट्यावधी रुपयांच्या रोकड प्रकरण हे महाराष्ट्र विधिमंडळाच्या गौरवशाली लौकिकाला गालबोट लावणारे आहे. तर सापडलेले पैसे हे विधिमंडळाच्या अंदाज समिती सदस्यांवरच आता आरोप करणारे ठरले आहे. यामुळे या गंभीर आरोपांबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाला देशात आगळी वेगळी प्रतिष्ठा लाभली असून वेगवेगळ्या क्षेत्रात देशपातळीवर नेतृत्व देणारे नेते या विधिमंडळाने निर्माण केले आहेत. या नेत्यांनी आपल्या महान कर्तृत्वाद्वारे आणि सर्वकष कामगिरीने या विधिमंडळाला उच्चस्तर व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. मात्र, विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तेथील विश्रामगृहातील एका खोलीमध्ये 1 कोटी 85 लाखांची रोकड आढळून आली. याहीपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आलेली होती, अशी चर्चा ऐकावयास मिळते. पण, ज्या खोलीत रोकड आढळून आली ती खोली अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या नावावर आरक्षित होती. तर ही रक्कम समितीतील सदस्यांना देण्यासाठी विश्रामगृहात ठेवल्याचा आरोप सध्या केला जातोय. असा आरोप होणे ही बाब अतिशय गंभीर असून महाराष्ट्र विधिमंडळाच्या गौरवशाली लौकिकाला गालबोट लावणारी आहे असे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
तसेच असा आरोप होणे देखील धक्कादायकच नाही, तर महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला आणि विधिमंडळाच्या पवित्रतेला कलंक लावणारी आहे. विधिमंडळ हे जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी असलेल सर्वोच्च व्यासपीठ आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून त्याचा वापर एका "डील"च्या माध्यमासारखा करण्यात येतोय, ही गोष्ट अत्यंत निंदनीय असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केलीय.
या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही आमदाराने, समिती सदस्याने किंवा शासकीय कर्मचाऱ्याने अशा प्रकारच्या गैरप्रकारात सहभाग घेतला असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. परंतु जर यामध्ये सरकारी यंत्रणेचा वापर करून विशिष्ट हेतूने बदनामीचे राजकारण सुरू असेल, तर तेथेही करवाई होणे गरजेची असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
विधानसभा असो वा विधानपरिषद दोन्ही सभागृहांच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या काही प्रथा परंपरा आहेत. ज्यामुळे एक वेगळेपण जपणारे आदर्शवत विधिमंडळ म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाने आपली ओळख जपली होती. परंतु, मागच्याच अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनीच अध्यक्षांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत ते सांगा, अशी विचारणा केली होती. विधिमंडळात प्रवेशपास मिळवून देण्यासाठी दहा-दहा हजार रुपये घेतले जातात, हे प्रसारमाध्यमांनीच समोर आणले होते. हे सारे या गौरवशाली विधिमंडळात घडत आहे. असे प्रकार गेली 30 वर्षांहून अधिक काळ विधिमंडळात येणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला पाहावे लागत आहे. जे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
विधानसभेचं पावित्र्य हे आमच्यासाठी सर्वोच्च असून त्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. म्हणूनच माझी आपल्याकडे मागणी आहे की, धुळ्यातील या प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी तातडीने सुरू करण्यात यावी, अंदाज समितीच्या धुळे दौऱ्याबाबत सर्व व्यवहारांची पारदर्शक माहिती विधानसभेसमोर मांडण्यात यावी, व त्यातील दोषर्षीवर कठोर कारवाई करण्यात यावी. आपण या प्रकरणी तात्काळ योग्य ती कारवाई कराल, अशी अपेक्षा करतो असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.