Santosh Kene News : डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवणारी घटना घडली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि सध्या प्रदेश सचिव म्हणून कार्यरत असलेले संतोष केणे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
संतोष केणे हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे मजबूत आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विशेषतः 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी त्यांनी सातत्याने आंदोलन केले आहे. भूमिपुत्रांचे प्रश्न, स्थानिकांना न्याय, तसेच विकासाच्या विविध मागण्या यासाठी ते नेहमी आक्रमक राहिले आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये ते महत्त्वाचे नेतृत्व मानले जात होते.दि. बा. पाटील यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यात यावे यासाठीच्या लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा प्रवेश घडवून आणल्याची चर्चा आहे. स्थानिक नेतृत्व बळकट करताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आणि आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्याच्या रणनीतीचा हा भाग असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसच्या स्थानिक आमदार-नेत्यांसोबत गेल्या काही महिन्यांपासून केणे यांचे संबंध तणावपूर्ण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी पुढील राजकीय भूमिका बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.या प्रवेशानंतर डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी होणार असून भाजपची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर भाजप आता आक्रमक होण्याची शक्यता आहे.
ठाकरेंचे जिल्हाप्रमुख तसेच काँग्रसचे प्रदेश सचिव भाजपमध्ये प्रवेश करत असताना कल्याणमधील राजकीय समीकरणे बदलली आहे. विरोधकांचे मोठे नेते भाजपने फोडल्याने येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दुबळी झाल्याची चर्चा आहे. तर, या नेत्यांच्या जाण्याने नव्या नेतृत्वाला संधी मिळेल, अशी शक्यता देखील विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.