

Maharashtra Congress controversy : मुंबई महापालिकेच्या निकालानंतर एकीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ६५ नगरसेवक निवडून आल्यानंतर सत्ता गेली असली तरी आनंद व्यक्त केला आहे. मुंबईत चौथा मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसमधील नेत्यांमध्ये मात्र निकालानंतर काही तासांतच घमासान सुरू झाले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप यांनी मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांना लक्ष्य केले होते. त्यांनी थेट गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी करत खळबळ उडवून दिली आहे. पक्ष संघटन कमकुवत आणि कुठलीही रणनीती नसल्याचा ठपका जगताप यांनी ठेवला आहे.
मुंबईत पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, याची जबाबदारी गायकवाड यांनी घेत पद सोडावे, अशी मागणी जगताप यांनी केली. एकीकडे पक्ष २४ नगरसेवकांच्या निवडीचा आनंद व्यक्त करताना पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने पक्ष नेतृत्वाने त्याची गंभीरपणे दखल घेतली आहे. दोन नेत्यांमधील वादाचा धमाका दिल्लीतही झाला आहे.
पक्षाकडून तातडीने जगताप यांना कारवाईचा इशारा दिला आहे. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून पुढील सात दिवसांत खुलासा मागविला आहे. गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हे पक्षशिस्तीचा भंग असल्याचे नोटिशीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे जगताप यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जगताप यांनी सात दिवसांत खुलासा न केल्यास किंवा त्यांनी दिलेला खुलासा पक्षाला न पटल्यास पक्षाच्या घटनेनुसार त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. राज्यातील काँग्रेसची स्थिती पाहता त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. मात्र, त्यांना पश्रश्रेष्ठींकडून तंबी दिली जाऊ शकते.
असे असले तर निवडणुकीनंतर लगेचच दोन नेत्यांमधील वाद समोर येणे, पक्षासाठी चांगले संकेत नाहीत. वर्षा गायकवाड या पक्षाच्या मुंबईतील एकमेव खासदार आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखालीच भाजप आणि ठाकरेंच्या लाटेत मुंबईत पक्षाचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे जगताप यांनी थेट त्यांच्यावर निशाणा साधल्याने मुंबई काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.