

Maharashtra politics : राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यातही दोन्ही शिवसेनेसह भाजप आणि मनसेसाठी मुंबई महापालिकेतील निवडणूक हायहोल्टेज ठरणार आहे. त्यामुळे मुंबईसाठीचा प्रत्येक निर्णय ‘तावून सुलाखून’ घेतला जात आहे. असाच एक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, शिंदेसेनेकडून त्याला विरोध करण्यात आला होता.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईत भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय 2014 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता. या स्मारकासाठी शिवाजी पार्क जवळील महापौर बंगला या जागेची निवड करण्यात आली आहे. स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये समितीच्या अध्यक्षपदाचा मान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना देण्यात आला होता.
ठाकरेंनी नोव्हेंबर 2019 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरेंकडे हे पद आले होते. त्यावेळी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते. समितीमध्ये सुभाष देसाई हे सदस्य सचिव तर आर्किटेक्ट शशीकांत प्रभु सदस्य होते. सदस्यांच्या चार जागा रिक्त होत्या. पदसिध्द सदस्य वगळता अध्यक्ष व इतर सदस्यांची न्यासावरील 5 वषांची मुदत 11 मार्च 2025 रोजीच संपली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर जानेवारी 2025 मध्ये वांद्रे येथे झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला होता. याबाबत फडणवीस यांची भेट घेऊन तशी मागणी करणार असल्याची माहिती पक्षाचे नेते रामदास कदम यांनीच दिली होती.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शनिवारी अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीला मान्यता देणारा जीआर काढला आहे. या समितीमध्ये आदित्य ठाकरे यांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर सुभाष देसाई हे सदस्य सचिव असतील. शिंदे सेनेच्या विरोधानंतरही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदाचा मान दिला आहे.
एकीकडे ठाकरेंना मान दिला असला तरी या समितीमध्ये शिंदेसेनेचे माजी आमदार शिशिर शिंदे आणि भाजपचे आमदार पराग आळवणी यांनाही स्थान देण्यात आले आहे. 2016 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये भाजप नेत्या पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता नव्या समितीतून आर्किटेक्ट शशीकांत प्रभू यांना वगळण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.