
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करून सुसंस्कृत राजकारणाचे महत्व अधोरेखित केले.
पवार यांनी भाजपच्या नेतृत्वावर (देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण) अशा वक्तव्यांची नोंद घेण्याची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत आदराने वागण्याची परंपरा असल्याचे सांगत यशवंतराव चव्हाण यांचा दाखला दिला.
Mumbai, 02 October : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी परवा पुन्हा एकदा आमदार जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली. त्यानंतर पुन्हा एकदा सुसंस्कृतपणाचे दाखले दिले जाऊ लागले आहेत. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनीही पडळकर यांनी केलेल्या विधानाबद्दल आपले परखड मत नोंदविले आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या वक्तव्याची नोंद घेतली पाहिजे,’ अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा दाखला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना महायुती सरकार पाठबळ देत आहे, असा आरोप केला होता. त्यावर अजित पवार म्हणाले, सरकार असं कोणालाही पाठबळ देत नसतं. कुठलंच सरकार असं करत नाही. ज्यांचं सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आहे. कुठल्या सरकारला वाटणार आहे की, अशा प्रकारचे वक्तव्ये करणाऱ्याला पाठबळ द्यावं.
आम्ही तीन पक्षाचं मिळून सरकार चालवत आहोत. महायुतीमध्ये प्रमुख पक्ष भाजप आहे. भाजपमध्ये जर कोणी काय वेगळं वक्तव्य केलं तर त्याची नोंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली पाहिजे. संघटनेचे महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून रवींद्र चव्हाण, तर विधीमंडळाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, शिवसेनेच्या कुठल्या नेत्याने असं आक्षेपार्ह विधान केले, तर त्याची नोंद एकनाथ शिंदे यांनी घेतली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणी असं विधान केलं तर मी आणि सुनील तटकरे यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. तशा पद्धतीने आम्ही त्याची दखल घेतो.
जयंत पाटील यांच्याबाबत मागे असंच विधान आलं होते. त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही भूमिका मांडली होती. पण, असल्या गोष्टी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात इतके वर्षे झाली कधीही घडलेल्या नव्हत्या. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेकांनी राज्याचं नेतृत्व केलं आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सुसंस्कृतपणा कसा सांभाळयचा असतो, टिकवायचा असतो, हे यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शिकलं पाहिजे. तेव्हा तर काँग्रेसचे बहुमताचं एकतर्फी सरकार असायचं. पण चव्हाणसाहेब विरोधकांसह सर्वांना आदाराने वागवायचे. ही आपली परंपरा आहे आणि राजकीय जीवनात काम करत असताना माझ्यासहीत सर्वांनी ही परंपरा जपली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आणि विनंती आहे.
....म्हणून शरद पवारांना भेटलो
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एक शैक्षणिक संस्था आहे. त्या संस्थेत बी. फार्मसी, डी. फार्मसी, पॉलिटेक्निक, इंजनिअरिंग आदींची महाविद्यालये आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शैक्षणिक संस्थेचे शरद पवार हे तहहयात अध्यक्ष आहेत. कारखान्याचे अध्यक्ष हे उपाध्यक्ष असतात. मी कारखान्याचा अध्यक्ष असल्याने मी कार्यक्रमाबाबत शरद पवार यांना भेटलो. त्या संस्थेची बैठक लावायची होती, बाकीच्या संबंधित लोकांनाही त्या ठिकाणी बोलावण्यात आले होते. शैक्षणिक व इतर संस्था चालवत असताना काही अडचणी असतात, धोरणे ठरवावी लागतात, त्यासंदर्भाने काही साधक बाधक चर्चा झाली, त्यासाठी मी पवारसाहेबांना भेटलो.
प्रश्न 1 : पडळकरांनी कोणावर टीका केली होती?
काँग्रेस नेते जयंत पाटील यांच्यावर.
प्रश्न 2 : अजित पवार यांनी कोणाला जबाबदार धरले?
भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण.
प्रश्न 3 : पवारांनी कोणत्या नेत्याचा आदर्श दिला?
यशवंतराव चव्हाण.
प्रश्न 4 : अजित पवार शरद पवारांना का भेटले?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शैक्षणिक संस्थेच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.