Mumbai : शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी(दि.१०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होमपीचवरुन भाजपवर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे अशी बोचरी टीकाही केली होती. याच टीकेला आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी ट्विट उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी “स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. 'कलंकीचा काविळ' असा उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं आहे. याचवेळी त्यांनी कलंकीचा काविळ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी असा सल्लाही त्यांनी ठाकरेंना दिला आहे.
फडणवीसांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय..?
उध्दव ठाकरेंनी नागपूर येथील भरसभेत फडणवीसांची ऑडिओ क्लिप ऐकवत खोचक टीका केली होती. त्याला फडणवीसांनी काँग्रेस(Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलेल्या ठाकरेंना आठ मुद्दे उपस्थित करत निशाणा साधला आहे.
फडणवीस म्हणाले, ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचबरोबर पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक! सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक! सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! पोलीस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक असल्याचं फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ?
नागपूरमध्ये येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात संबोधित करताना उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)नी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, फडणवीसांची हालत सध्या सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे. ठाकरेंनी यावेळी फडणवीसांची एक ऑडिओ क्लिप उपस्थितांना ऐकवली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी युती शक्य नाही असं ते म्हणाले होते. यावर "अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा अशी बोचरी टीका केली होती.
तसेच उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.