Devendra Fadnavis - Uddhav Thackeray Meeting : 'ते' दोघे लिफ्टमध्ये एकत्र काय गेले, आपण काय काय गमावले ते कळले!

Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray : विरोधी पक्षांतील दोन नेते सार्वजनिक ठिकाणी भेटले तरी त्याची आता मोठ्या प्रमाणाच चर्चा होत आहे. राजकीय समंजसपणा लयाला जाऊन नवीनच राजकीय संस्कृती निर्माण झाल्याचे हे चित्र आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडींचे हे फलित आहे.
Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Meet Uddhav ThackeraySarkarnama

Sarkarnama Analysis : गेल्या पाच वर्षांत राजकारण इतके अनिश्चित झाले आहे, की कधी काय होईल याचा नेम राहिलेला नाही, त्यामुळे विरोधी विचारसरणीचे किंवा विरोधी आणि सत्ताधाऱ्यांची साधी भेट झाली तरी चर्चांना उधाण येत आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी असाच चर्चा आणि तर्कवितर्कांनी जोर धरला होता. निमित्त होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लिफ्टमधून एकत्र जाण्याचे.

विरोध विचारांना असतो, व्यक्तीला नाही, हे चित्र सध्याच्या काळात दुर्मिळ झाल्याचे दिसत आहे. पक्षाच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे माणूस म्हणून राजकीय नेत्यांमध्येही संबंध असू शकतात, याचा विसार सर्वांनाच पडू लागला आहे. यशंवतराव चव्हाण, वंसतदादा पाटील, शरद पवार (Sharad Pawar), विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आदी मातब्बर नेत्यांनी वैचारिक विरोध आणि वैयक्तिक विरोध याची गल्लत होऊ दिली नाही. पक्ष वेगळे असले तरी या नेत्यांनी मैत्रीचे संबंध हळुवारपणे जपले. दिवगंत विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचे दाखले आजही दिले जातात. राजकारणात मत्सर, द्वेषाचे प्रमाण वाढू लागले तसे या निखळ मैत्रीला जणू ग्रहण लागत गेले.

Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray
Eknath Shinde On Fadnavis - Thackeray Meeting : ठाकरे - फडणवीस भेटीवर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,'ती लिफ्ट...'

गेल्या पाच वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडी आणि त्यानंतर नेत्यांनी एकमेकांवर केलेली चिखलफेक, एमकेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप शरमेने मान खाली घालायला लावणारे आहेत. प्रमुख नेत्यांपेक्षा त्यांची हुजरेगिरी करणाऱ्या नेत्यांनी तर कहरच केला. नेते सोबत असताना त्यांना एकमेकांच्या बऱ्याच खासगी बाबी माहीत असतात. त्या बाहेर येणे अपेक्षित नसते. मात्र मैत्रीचे रूपांतर राजकीय शत्रुत्वात झाले की अशा बाबी जाहीरपणे मांडल्या जात असल्याचे गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने पाहिले आहे. आता आमचे तोंड उघडायला लावू नका... हे गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक वेळा उच्चारले गेलेले वाक्य असावे.

शिवसेना-भाजपची (Shisena) युती तुटली. महाविकास आघाडी अस्तित्वात आली. या आघाडीचे सरकारही स्थापन झाले. टोकाची वेगळी विचारसरणी असलेले शिवसेना आणि काँग्रेस या निमित्ताने एकत्र आले. त्यानंतर 25 वर्षांपासून मित्र असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमधील कलगीतुरा सर्वांनीच अनुभवला आहे. त्याची पातळी चिंता वाटावी इतकी घसरली. हे लोण खालपर्यंत झिरपले. कार्यकर्त्यांमध्येही कटुता आली. त्याचे प्रतिबिंब सामाजमाध्यमांत उमटू लागले. सलोखा, समंजसपणा जणू हरवला की काय, असे चित्र दिसू लागले. कालांतराने शिवसेना फुटली, महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर तर वाचाळपणाने कळस गाठला. राजकीय संवादाच्या दर्जाची कधी नव्हे इतकी घसरण झाली. पाण्यासाठी कधीकाळी नळावर होणारी भांडणेही त्यासमोर फिकी पडली.

Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray
Thackeray And Fadnavis meeting : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर शिंदे गटाची मवाळ प्रतिक्रिया; म्हणाले, आमचं भांडण...

अशा या एकंदर वातावरणात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लिफ्ट येण्याची वाटत पाहत एकत्र थांबल्याचे, नंतर एकत्र लिफ्टमधून गेल्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. हे दोघे पुन्हा एकत्र येणार का, यावर चर्चेच्या फैरी झडू लागल्या. शिंदे गटाकडून या भेटीवर खोचक प्रतिक्रिया आली. तशीच प्रतिक्रिया ठाकरे गटाकडूनही आली. दोन्ही गटांनी उणीदुणी काढण्यासाठी ही संधीही सोडली नाही! सार्वजिनक ठिकाणी विरोधी पक्षांतील दोन नेत्यांची भेट ही एक अत्यंत साधारण घटना समजली गेली पाहिजे. मात्र तसे झाले नाही. दोन विरोधी नेते भेटले तरी त्याची इतकी चर्चा होऊ शकते, खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ शकतात... याचा अर्थ असा की आपण खूप काही गमावले आहे, पक्षाच्या पलीकडे संबंध असतात, दोन विरोधी नेते भेटू शकतात, सद्भाव, सलोखा वगैरे वगैरे...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com