Dombivli News: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात दीपेश म्हात्रे यांनी शिंदे सेनेला ‘रामराम’ ठोकत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात ते ठाकरेंच्या सेनेकडून उतरणार आहेत. म्हात्रेंच्या रूपानं ठाकरेंना तगडा उमेदवार मिळाला आहे. मात्र, म्हात्रेंच्या प्रवेशामुळे ‘मातोश्री’च्या जवळील निष्ठावंत पदाधिकारी नाराज झाले आहेत. हा नाराज निष्ठावंतांचा गट पक्षाला लवकरच सोडचिठ्ठी देणार आहे.
विधानसभेचं बिगुल वाजल्यानं तिकीट वाटपासाठी इच्छुकांच्या इकडून-तिकडे उड्या चालल्या आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांच्या लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात बंडखोरी होण्यास सुरुवात झाली आहे. खासदार डॉ. शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी नुकताच शिंदे गटातून बाहेर पडत ठाकरे गटात प्रवेश केला. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी लढण्यास ते इच्छुक आहेत.
डोंबिवली हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आणि येथील विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध, यामुळे चव्हाण यांना डावलून शिंदे गटाला येथे जागेची मागणी करणे शक्य होणार नाही.
त्याच पार्श्वभूमीवर म्हात्रे यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे म्हात्रे यांनी ठाकरेंची मशाल हाती घेऊन डोंबिवली मतदारसंघात नशीब आजमावण्याचा विडा उचलला आहे. म्हात्रे यांना पक्षाकडून अद्याप उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, त्यांनी त्या आधीच मैदानात उतरत तयारी सुरू केली आहे.
दीपेश म्हात्रे यांचा पक्ष प्रवेश व त्यांचे सुरु झालेले काम यामुळे डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटातील जुन्या निष्ठावंतांचा एक गट नाराज आहे. म्हात्रे यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांच्यासोबत हा गट कधीच दिसून आला नाही. तसेच, शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर म्हात्रे यांना स्थान दिले नाही. यामुळे ही नाराजी उघड उघड दिसून येत होती. या नाराजीमुळेच येत्या दिवसांत डोंबिवलीमधील निष्ठावंतांचा हा नाराज गट लवकरच ठाकरे गट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देणार आहे. त्यात डोंबिवली शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. या नाराज गटाला आपल्या पक्षात खेचण्यासाठी शिवसेना शिंदे गट व भाजपा दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.