

Kalyan Dombivali News: आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटासाठी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) डोंबिवलीतून मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे पुन्हा एकदा फुटीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असल्याने मातोश्रीवरून थेट नव्या जिल्हाप्रमुखांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपेश म्हात्रे यांनी अल्पावधीतच जिल्हाप्रमुखपद मिळवले आणि गेल्या वर्षभरात मोर्चे, आंदोलने या माध्यमातून लढवय्या भूमिका घेऊन पक्षामध्ये जोश निर्माण केला होता. गेल्या तीन-चार महिन्यांपासून म्हात्रे यांनी कोणतीही विरोधात्मक भूमिका मांडलेली नाही, ज्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गणेशोत्सवात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी म्हात्रे यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेतल्याने राजकीय युद्ध शमल्याच्या चर्चांना उधाण आले. तसेच, त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सलोख्याचे संबंध असूनही, माजी खासदार कपिल पाटील यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधांमुळे त्यांचा कल भाजपच्या दिशेने अधिक असल्याची चर्चा आहे.
दीपेश म्हात्रे यांच्या वर्तनाबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या तक्रारी थेट मातोश्रीपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच, त्यांच्या संभाव्य निर्णयामुळे पक्षामध्ये राजकीय गडबड होऊ नये यासाठी 'डॅमेज कंट्रोल' म्हणून पक्षनेतृत्वाने पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू केला आहे. ठाकरे गटातर्फे जिल्हा संघटक तात्या माने, महिला जिल्हा संघटक वैजयंती दरेकर, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे आणि ग्रामीण प्रमुख राहुल भगत यांच्या नावांची अंतर्गत चर्चा सुरू आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्याने या पालिकेला विशेष महत्त्व आहे. निवडणुकीपूर्वी दीपेश म्हात्रे यांचा निर्णय भाजप- शिंदे गटाचा डाव यशस्वी करतो की नाही, यावरच ठाकरे गटाची स्थानिक संघटनात्मक रचना अवलंबून राहणार आहे.
एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “म्हात्रे आमचा ताकदवान चेहरा आहेत, पण पक्षात स्थैर्य ठेवण्यासाठी पर्यायी नेतृत्वाची तयारी ठेवणे गरजेचे आहे. अंतिम निर्णय मातोश्रीवरून घेतला जाईल.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.