Maharashtra Politics : सध्या राज्यातील काही शहरात दोन समजात दंगल घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या राज्यातील विविध ठिकाणी दंगलसदृश्य घटना घडत आहेत. अकोला शहरात पोलिसांसमोरच दोन गटात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. राज्यातील अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावावे. पोलीस कुणाच्या दाबावाखाली काम करतात का, असा थेटच प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस महासंचाकलांना केला.
राज्यातील अनेक ठिकाणी दंगलसदृश्य घटना होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या (Congress) शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची भेट घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पटोले यांनी पोलीस दबावाखाली काम करीत असल्याचा संशय व्यक्त केला.
पटोले म्हणाले, "अकोल्यात (Akola) दोन हजार पोलीस आहेत. दंगलीनंतर मात्र ठाण्यात पोलीस नव्हते, ही आश्चर्याची बाब आहे. अनेक दिवसांपासून दंगलीबाबत कट शिजत होता. आरोपीमध्ये 'चॅटींग' सुरू होते. याबाबत 'आयबी'ला माहिती नव्हती काय? रात्री घटनेनंतर एक समूह पोलीस ठाण्यात पोहचला. तेथे 'एसपी'ही पोहचले. नागरिकांचा गट नारेबाजी करीत होता. त्यानंतर 'एसपीं'नी त्या गटाला तेथेच का थांबवून ठेवले नाही? त्यानंतर संपूर्ण शहरात दगडफेकीचे लोन पसरले. त्यात पोलीस सहभागी होते का, असा प्रश्न उपस्थित होतो. अशा प्रकराचाी पोलिसांची बदनामी कधीही झाली नव्हती."
राज्य सरकारच्या (State Government) गलथान कारभारामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य अंधारात गेल्याची टीकाही पटोले यांनी यावेळी केली. पटोले म्हणाले, "एमपीएससीचे पेपर फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातील आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. ही बाब गंभीर आहे. आरोपींना मोकाट सोडून राज्य सरकार 'एमपीएससी'ला धोक्यात आणण्याचे काम करीत आहे. परिणामी ८० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे."
त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. ते म्हणाले, "त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला काही संघटनांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले. गावकऱ्यांनी सामंज्यस्याची भूमिका घेत गावात शांतता असल्याचे स्पष्ट केले असतानाही बाहेरुन काही संघटनांचे लोक त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन चिथावणी देण्याचे व वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत."
बारसू परिसरात दडपशाहीसाठीच पोलीस बंदोबस्त ठेवल्याचा आरोपही पटोलेंनी केला. ते म्हणाले, "रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील बारसू रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना व महिला आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर केला. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना तडीपार केले जात आहे. हा पोलिसी अत्याचार थांबवून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. मुंबई-वडोदरा महामार्गासाठी जमीन संपादन करताना आदिवासी महिलांवरही अत्याचार करण्यात आले. हा अत्याचार थांबवून संबंधित पोलिसांवर कारवाई केली पाहिजे."
महाराष्ट्रातून (Maharashtra) दररोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत असल्याकडेही पटोले यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, "जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्याच्या कालावधीत राज्यातून सुमारे ५५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातून मुली व महिला बेपत्ता होत असताना सत्ताधारी ‘केरल स्टोरी’ सिनेमा बघण्यात मग्न आहेत. मुली बेपत्ता प्रकरणी योग्य ती पावले उचलून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.