Mumbai : 'मातोश्री'शी एकनिष्ठ असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोऱ्हे यांचा शिंदे गटातील प्रवेश उध्दव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पण आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच ठाकरे गटाने शिंदे गटात प्रवेश केलेल्या गोऱ्हे, मनिषा कायंदे यांच्यासह विप्लव बजोरिया यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ठाकरे गटाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ( Dr. Neelam Gorhe), प्रा. मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया या तीनही नेत्यांविरोधात अपात्रतेच्या कारवाईची मागणी करणार असल्याचं समोर येत आहे. या तीनही जणाचं पक्षांतर कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या तिघांना अपात्र घोषित करा अशीही मागणी करण्यात येणार आहे. याचवेळी अपात्रतेची कारवाई सुरू असताना गोऱ्हे यांना पीठासीन अधिकाऱ्याचे काम करण्यास मज्जाव करा अशीही आक्रमक भूमिका ठाकरे गट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नीलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशाला काही तासांचा अवधी उलटत नाहीतोच भाजपकडून त्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं होतं. भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचा ठराव मांडला होता. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रविण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला होता. तर प्रसाद लाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं होतं.
आता ठाकरे गटाकडून गोऱ्हेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला जाण्याची शक्यता आहे. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार त्यांना पाठिंबा देतील अशी माहिती समोर येत आहे. यामुळे नीलम गोऱ्हे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे या पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांनी गोऱ्हे यांच्याविरोधात सभापती रामराजे नाईक निंबाळकर(Ramraje Naik Nimbalkar) यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र, आता हा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा असा प्रस्ताव दरेकर यांनी मांडला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.