Mumbai News : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला चेन्नईमधून अटक केल्यानंतर आज (बुधवारी) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ललित पाटीलला सोमवार (दि.२३ ऑक्टोबर) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
यानंतर मुंबई पोलिस सहआयुक्तांनी पत्रकार परिषदेत पाटीलच्या अटकेबद्दल सविस्तर भाष्य केले. ललित पाटील हा श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत होता, त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि त्याच्या आणखी एका साथीदाराला नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली होती.
"ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत आम्ही १५ आरोपींना अटक केली आहे. ललित पाटील हा १५ वा आरोपी आहे. ड्रग्ज तयार करणे आणि त्याचा पुरवठा करणे, या प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात आम्ही ड्रग्ज प्रकरणात नाशिकमध्ये छापेमारी केली होती. तेव्हापासून मुंबई पोलिस ललित पाटीलच्या मागावर होताे. या प्रकरणात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या छापेमारीत तब्बल १५० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
ड्रग्जचे हे सर्वात मोठे रॅकेट उद्ध्वस्त केल्याची" माहिती सहपोलिस आयुक्तांनी दिली आहे. तसेच, ससून रुग्णालयातील पलायनासंदर्भात पुणे पोलिसच तपास करतील, असेही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दोन आठवड्यांपूर्वी ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन ससून रुग्णालयातून पळून गेला. त्यानंतर आज चेन्नईतून मुंबई पोलिसांच्या पथकाने अटक केली. ससूनमधून पळाल्यानंतर तो १५ दिवस फरार होता. अनेकदा पोलिसांना त्याने गुंगाराही दिला. ज्या-ज्या ठिकाणी पोलिस जायचे तेथून तो पळून गेलेला असायचा.
ससूनमधून बाहेर पडल्यानंतर तो सर्वात आधी नाशिकला, चाळीसगावला गेला. त्यानंतर तो धुळे, संभाजीनगरमध्ये लपून बसला. तिथून पुढे तो गुजरातला गेल्याची माहिती समोर आली. जवळपास तीन दिवस तो गुजरातमध्ये होता.
अखेर पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांची पाच आणि पुणे पोलिसांची १० अशी १५ पथके तयार केली. ही १५ पथकेही गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मागावर होती. तो श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला चेन्नईतून अटक केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.