मुंबई : दसरा मेळाव्यावरून (Dussehra Melava) शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) पुन्हा एकदा आमने सामने आले होते. मात्र, तो वाद आता थांबण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्री शिंदे गटाने शिवाजी पार्कबरोबरच बीकेसीमधील एमएमआरडीएच्या मैदानासाठी अर्ज केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Dussehra Melava of Shinde group will be held at BKC ground)
शिवसेना दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर भरतो. प्रथेप्रमाणे यंदाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी शिवसेनेकडून अर्ज करण्यात आला होता. मात्र, शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून दोन गटात जुंपली होती. त्यामुळे शिवाजी पार्कवर नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार, याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली होती.
प्रथम येणाऱ्यास शिवाजी पार्क मैदान देण्याचे मुंबई महापालिकेचे धोरण आहे. त्यामुळे आधीच अर्ज करून ठेवलेल्या शिवसेनेला अर्थात उद्धव ठाकरे यांना हे मैदान मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शिंदे गटाने दोन पावले मागे येत ऐनवेळचा पर्याय म्हणून एमएमआरडीएच्या मैदानाची तयारी करून ठेवली आहे. दरम्यान, हे बीकेसीचे मैदान मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर आहे, त्यामुळे ठाकरे यांच्या घराजवळ शिंदे गटाचा दसरा मेळावा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. आम्हीच खरी शिवसेना असून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार आहोत, असे अनेकदा म्हटले आहे. त्यातच शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह यावर एकनाथ शिंदे गटाकडून वारंवार दावा केला जात आहे. त्या बाबतचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात प्रलंबित आहे.
दुसरीकडे शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होताना दिसत आहे. आम्ही खरे हिंदुत्ववादी, बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार असे सांगून दसरा मेळावा घेण्याचा निर्धार या गटाने केला आहे. त्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, म्हणून मुंबई महापालिकेकडे अर्जही केला आहे. मात्र, तत्पूर्वीच ठाकरे यांचा अर्ज दाखल झालेला होता. महापालिकेचे धोरण लक्षात घेता ते मैदान शिवसेनेला मिळण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे शिंदे गटाने बीकेसी मैदानाच पर्याय निवडल्याचे दिसून येते. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संषर्घ टाळावा. त्यांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.