

Maharashtra government Announces Closure Decision : मागील काही महिन्यांत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुरू झालेल्या काही योजना बंद करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच आता त्यात आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना सप्टेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेली एक कंपनी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी ‘MAHA ARC LIMITED’ वित्त विभागाच्या 27 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आली होती. ही कंपनी बंद करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर लगेच त्याबाबतचा जीआरही काढण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार, केंद्र सरकारने डबघाईला आलेल्या तसेच अवसायनात गेलेल्या वित्तीय संस्था तसेच बँकांच्या बुडीत कर्जाची पुनर्रचना करून अशा बँकांच्या ग्राहकांचे आर्थिक हित जपण्यासाठी नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील, शासनाचा कोणताही प्रकारे संबंध येत असलेल्या तसेच संकटात सापडलेल्या किंवा संकटात सापडण्याची शक्यता असलेल्या मालमत्तांची पुनर्रचना करून, त्यांचे संवर्धन किंवा उचित विल्हेवाट लावण्यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 2023 मध्ये या कंपनीचा परवाना नाकारल्याने, कायदेशीरदृष्ट्या या कंपनीला कामकाज पाहणे शक्य नसल्याने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. याबाबत मंगळवारी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातही हे कारण नमूद करण्यात आले आहे.
‘जीआर’मध्ये म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने 26 जून 2023 रोजीच्या सूचनांनुसार तसेच SARFAESI Act, 2002 च्या कलम 3(1) व कलम 3(3)(f) च्या तरतुदीनुसार कंपनीला मालमत्ता पुनर्रचना कंपनी ‘ARC’ म्हणून कारभार करणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नसल्ये तसेच त्यामुळे कंपनीचे कामकाज सुरू झालेले नसल्याने ही कंपनी बंद करण्यात आल्याचे म्हटले आहे. कंपनी बंद करण्याच्यादृष्टीने पुढील सर्व कार्यवाहीसाठी कंपनीचे अध्यक्ष व वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.