
India-Pakistan Conflict : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सध्यातरी थांबला आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीनंतर हल्ले थांबविण्यात आले आहेत. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. भाजप व मित्रपक्षांकडून सध्या देशभरात तिरंगा यात्रा काढली जात आहे. ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा केला जात आहे. अमित ठाकरेंनी त्यावरच बोट ठेवले आहे.
अमित ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे की, विजयाचे प्रतिक म्हणून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थती विजयाची नसून युध्दविराम आहे. म्हणूनच ज्या घटनेत जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव मनाला वेदाना देणार आहेत.
या काळात काही अभिव्यक्त करायचं असेल तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा विजय यात्रा या समर्पक वाटत नाहीत. याक्षणी देशवासियांच्या मनात एकच भावना आहे, शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
युध्दविराम जाहीर झाला असला तरी पाकिस्तानच्या गतइतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनीही यापूर्वीही अनेकदा अशाच संधींमध्ये दगाफटका केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणे, युध्दजन्य परिस्थितीत त्यांना काय करावे, याचे मार्गदर्शन करणे आणि त्यांची मानसिक तयारी घडवून आणणे हेही सरकारच्या धोरणाचा महत्वाचा भाग ठरायला हवा, असे अमित ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.
मोदीजी, आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. म्हणूनच या पत्राद्वारे मनापासून विनंती करतो की, युध्दाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रध्दांजली म्हणून या काळात संयम बाळगावा. आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.