Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आपल्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एकीकडे सांगलीच्या (Sangli) जागेवरून आघाडीतील मतभेदही उघड झाले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाने अद्याप लोकसभा उमेदवारांची यादीच जाहीर केलेली नाही. त्यामुळे पवार गटाकडून लोसभेच्या रिंगणात कोण उतरणार, याबाबतची उत्सुकता राज्याच्या राजकारणात लागून राहिली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची काल एक बैठक झाली असून, आमच्या वाट्याला 10 ते 11 जागा येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.
शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या जागावाटपाबाबत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, "काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डाची एक बैठक पार पडली आहे. आमच्या वाट्याला 10-11 जागा येणार आहेत, याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आमची उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. आज काही इच्छुक उमेदवारदेखील भेटून गेले आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत आम्ही बैठक घेऊन आमचे उमेदवार जाहीर करू."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या (Hatkalangane Lok Sabha Constituency) जागेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, हातकणंगले लोकसभेची जागा कोणाला द्यायची याचा निर्णय शिवसेना ठाकरे गट ठरवणार आहे. आमची राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्याशी चर्चा सुरू होती पण त्यांनी स्वतंत्र निर्णय घेतला आहे. मात्र, राजू शेट्टींचा केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांना विरोध असेल तर त्यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे, असंही पाटील या वेळी म्हणाले.
वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला, या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर बोलताना पाटील म्हणाले, "पाठीत खंजीर खुपसला असं काही झालेलं नाही. उलट प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आमच्याबरोबर यावेत असं आम्हाला वाटतं. आंबेडकरांनी अजूनही विचार करावा आणि एकत्रित यावे."
बारामतीचा उमेदवार आम्ही जाहीर केलेला नाही, पण विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देणार हे ठरलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे आमचे उमेदवार आहेतच पण त्याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही. मुंबईत (Mumbai) जागेसाठी आमचे कार्यकर्ते आग्रही होते. आम्हीही त्याबाबत मत मांडले होते. पण अजून काही ठरलेलं नाही. लवकरच अधिकृत जागावाटप जाहीर करणार असल्याचंही पाटील म्हणाले.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.