मुंबई : राज्य सरकारनं किराणा दुकानांतून वाईन (wine) विक्रीला परवानगी दिली आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
हजारे यांनी यासंबंधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ठाकरे सरकारनं अद्याप अण्णांना उत्तर न दिल्यानं अण्णांनी पुन्हा स्मरणपत्र पाठविलं आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अण्णांना सुनावलं आहे.
''आदरणीय अण्णा हजारेंनी फक्त महाराष्ट्रातल्या वाइन विक्री विरोधात प्राणांतिक उपोषण न करता, संपूर्ण देशात सरसकट दारूबंदी व्हावी यासाठी दिल्लीत मोदी सरकारला धारेवर धरत प्राणांतिक उपोषण करावे,'' असा खोचक सल्ला आव्हाडांनी अण्णांना दिला आहे.
राज्य सरकारला अण्णा हजारे यांनी ३ फेब्रुवारी पत्र पाठवलं आहे. त्याचं उत्तर न मिळाल्याने शनिवारी (ता. ५) अण्णांनी पुन्हा स्मरणपत्र पाठवून उपोषणावर ठाम असल्याचं कळवलं आहे. याबाबतची तारीख जाहीर केली नसली तरी राज्यात एकाचवेळी आंदोलन होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अण्णा हजारे यांनी शनिवारी पत्र पाठवले आहे. ३ फेब्रुवारीला आपण पाठविलेल्या पत्राचे उत्तर न आल्याने हे स्मरणपत्र लिहित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अण्णा हजारे यांचे राज्यभरातील कार्यकर्ते या निर्णयाच्या विरोधात एकाच वेळी तीव्र जनआंदोलन उभारणार आहेत. तशा आशयाचे पत्र हजारे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना तीन फेब्रुवारीस पाठविले असून आजही पुन्हा हजारे यांनी मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांना स्मरण पत्र पाठविले.
राज्यातील अनेक संस्था व संघटनांनी वाईनच्या निर्णया विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पक्षविरहित समाज, राज्य आणि राष्ट्र हिताचा विचार करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठविण्यासाठी राज्यात विभागवार बैठक आयोजित करणार आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.