Thane News : राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील विशेष अधिवेशनात बोलताना श्रीराम हे मांसाहारी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) आव्हाडांविरोधात आक्रमक झाले आहेत.
शिवसेना शिंदे गटाने आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करणारे ट्वीट केले. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आमदार आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद बंगला या निवासस्थानाबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कार्यकर्ते महाआरती करून आव्हाड यांचा निषेध नोंदविण्याच्या तयारीत असताना वर्तकनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यासर्व प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडही (Jitendra Awhad) संतपाले आहेत. त्यांनी अजित पवार गटावर ट्वीटद्वारे जोरदार टीका केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'माझ्या घरावर आता अजित पवार(Ajit Pawar) यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला. पण, सम्राट भरत यांनी श्री रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला.'
याशिवाय 'इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हानून पाडू आम्ही ! तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्री राम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवताहेत.' असंही आव्हाड यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
नरेश म्हस्के म्हणतात, ''आव्हाड डोक्यावर पडला आहे का? असं लोक आम्हाला विचारतात आता तर आमची खात्रीच पटली आहे की लोक खरंच बोलतात. काय खाऊन बोलतोस तू तुझं तुला कळतं का?, वाटेल ते बोलताना नरडं थोडं जळतं का?, दिवस-रात्र मांसाहार ओरपणारा तू तुला कशी कळेल रामायणाची खरी कथा. तुझ्यासारखे नतद्रष्ट, रामाचं नाव घेतात हीच राम भक्तांची व्यथा.''
याचबरोबर ''मोठे रामायणाचे दाखले देतोस ग्रंथ वाचला का विचारतोस तू? रामायणाचे सगळे ग्रंथ कोणी लिहिले कधी स्वतः बघतोस का रे तू? रामायण लिहिणारे बहुजनच होते पण सत्य आणि धर्मनिष्ठ होते तुझ्यासारखे त्यांच्या डोक्यात नको ते किडे नव्हते. तूच एकदा डोक्यावरचा रुमाल काढून रामायण वाच आणि मग ज्ञान पाजळत गावभर थय थय नाच.'' असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत.
याशिवाय 'अहो हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, हे बरोबर बरोबर बोलतायत ना? तुमच्या हिंदुत्वाशी अगदी बरोब्बर नाळ जोडतायत ना...?' असा सवाल करत ठाकरेंवर म्हस्केंनी टीका केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.